आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्र्यांना दिवाळीला यंदा डाळींचे ‘गिफ्ट बॉक्स’, विरोधक नोंदवणार निषेध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - डाळींच्या गगनाला भिडलेल्या किंमती राज्य सरकारने आटोक्यात न आणल्याच्या निषेधार्थ विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्री व राज्यातील सर्व मंत्र्यांना दिवाळीनिमित्त डाळींचे ‘गिफ्ट बॉक्स’ पाठवणार आहेत. राज्य सरकारने वारंवार आश्वासने दिल्यानंतरही डाळींचे भाव फारसे कमी झालेले नाहीत. शिवसेनेने मुख्यमंत्र्यांच्या हवाल्याने गुरुवारपासून १२० रुपये किलो होणार असल्याची घोषणा केली. परंतु सध्याही जुन्याच दराने डाळ विक्री होत असल्याने प्रतीकात्मक निषेध म्हणून गिफ्ट बाॅक्स देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे विखे-पाटील यांनी स्पष्ट केले.

सरकारने डाळींच्या आयातीपासून ते साठेबाजांवर छापे टाकण्यापर्यंत अनेक घोषणा केल्या. पण, या घोषणा म्हणजे जनतेची दिशाभूल करणारे ठरल्या असल्याचे विखे यांनी गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत सांगितले. राज्य सरकारने स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून माफक दरामध्ये डाळींची विक्री करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली होती. परंतु सरकारने या संदर्भात काहीही कारवाई केली नाही. त्यामुळे ऐन दिवाळीत सर्वसामान्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत असून जनतेची मोठी निराशा झाली आहे. याचा आम्ही निषेध नोंदवणार आहोत, असे विखे-पाटील यांनी सांगितले.

देशमुखांची चौकशी का नाही?
नीलगाय शिकार प्रकरणात भाजपचे आमदार आशिष देशमुख यांची अद्याप चौकशी का झाली नाही, अशी विचारणा विखेंनी केली. देशमुख यांनी शिकार केली की नाही, हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल. परंतु शिकारीचे प्रकरण समोर आल्यानंतर संबंधित विभागाने गुन्हे दाखल करून देशमुख यांची चौकशी करणे अपेक्षित होते. परंतु या सरकारने ‘क्लीन चिट’ देण्याचे धोरण स्वीकारले आहे, असा टोला विखे पाटील यांनी लगावला.

स्वाती अभय योजना सुरू करावी
विद्यार्थ्यांना मोफत बससेवा देणारी स्वाती अभय योजना केवळ निवडक जिल्ह्यांत नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात लागू करावी, अशीही मागणी विखेंनी केली. बस पाससाठी २६० रुपये नसल्याने लातूरच्या स्वाती पिटले नामक विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती. दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने विचार करण्याची मागणी वारंवार करण्यात आली. परंतु सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले व स्वातीचा बळी गेल्यानंतरच सरकारला जाग आली. परिवहन मंत्रालयाने आपली इभ्रत वाचविण्यासाठी स्वातीच्या नावाने फक्त ८ जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत बससेवा देणारी स्वाती अभय योजना सुरू केली. राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्येही परिस्थिती भयावह आहे, याकडे विखेंनी लक्ष वेधले.

सेनेचेही लक्ष ‘पाकीटमारी’वर
सव्वा महिन्यापूर्वी सरकारने विक्रीकरात ५ टक्के वाढ आणि पेट्रोल व डिझेलची रुपयांनी सरसकट दरवाढ केली होती. त्यावेळी शिवसनेने भाजप ‘पाकीटमारी’ करत असल्याचे म्हटले होते. आता शिवसेनेचे नेते व राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिवाळीच्या काळात एसटीच्या प्रवासी भाड्यात १० ते २० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला असून, ही ‘पाकीटमारी’ नव्हे तर दुसरे काय आहे, असा प्रश्न विखे-पाटील यांनी उपस्थित केला. दिवाळीच्या काळात प्रवाशांची संख्या जास्त असते म्हणून खासगी बस कंपन्या प्रवासी भाड्यांमध्ये अवास्तव वाढ करतात. दिवाकर रावतेंच्या परिवहन मंत्रालयाने खासगी बस कंपनींच्या लुटमारीला चाप लावून प्रवाशांना दिलासा द्यायला हवा होता. मात्र, परिवहन मंत्र्यांनी खासगी वाहतूक कंपन्यांच्या खांद्याला खांदा लावून एसटी प्रवाशांकडूनही नफा उकळण्याचा प्रस्ताव ठेवल्याने त्यांचे आणि खासगी बसमालकांचे संगनमत आहे की काय, असा संशय निर्माण झाल्याचे विखे म्हणाले.