आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opposition Demand 25 Thousand Rupees Help For Farmers In Vidarbha

विदर्भातील शेतकर्‍यांना हेक्टरी 25 हजार रुपये नुकसानभरपाई जाहीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अतिवृष्टीने झोडपलेल्या विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकर्‍यांना सरसकट हेक्टरी पंचवीस हजार रुपये द्यावेत, या मागणीसाठी आक्रमक झालेल्या विरोधकांनी सोमवारी विधानसभेत राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. विदर्भातील सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीही या मागणीला पाठिंबा दिल्यामुळे सरकार कोंडीत सापडले होते. याच गदारोळात नगरविकास, सामाजिक न्याय, नियोजन आणि आदिवासी विकास विभागांच्या तब्बल 2 हजार कोटींच्या मागण्या कुठल्याही चर्चेविना संमत केल्यानंतर विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. दरम्यान, पावसामुळे जमीन वाहून गेलेल्या विदर्भातील शेतकर्‍यांना हेक्टरी 25 हजारांची मदत देण्याची घोषणा मदत व पुनर्वसनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी केली.

अस्मानी संकटामुळे विदर्भातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालझाल्याने आणि दुबार-तिबार पेरण्यादेखील वाया गेल्याने संकटग्रस्त शेतकर्‍यांना देशोधडीला लागण्यापासून वाचवण्यासाठी विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकर्‍यांना सरसकट हेक्टरी 25 हजार रुपये मदत द्यावी, या मागणीसाठी सुधाकर देशमुख, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, कृष्णा खोपडे, प्रकाश डहाके, आशिष जैस्वाल, दादाराव केचे, संजय कुटे आदी आमदारांनी लक्षवेधी सूचनेद्वारे चर्चा उपस्थित केली होती. त्यांच्या मागणीला वीरेंद्र जगताप, विजय वडेट्टीवार, गोपालदास अग्रवाल, सुभाष झनक, नामदेव उसेंडी या सत्ताधारी आमदारांनीही पाठिंबा दर्शवला. त्या वेळी नुकसानीचा आढावा आठ दिवसांत घेण्यात येईल व त्यानंतर नुकसानभरपाईची रक्कम देण्यात येईल, अशी भूमिका पतंगरावांनी घेतली. तसेच वाहून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी 25 हजार रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली.

सरसकट मदत द्या
सरकारच्या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या दोन्हीही बाजूच्या सदस्यांनी वेलमध्ये धाव घेतली. वाहून गेलेल्या जमिनीसाठी 25 हजार रुपयांची मदत करण्याची तरतूद पहिल्यापासूनच अस्तित्वात आहे. मंत्री विदर्भाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करत असून सरसकट सर्वच शेतकर्‍यांना ही मदत द्यावी, अशी मागणी विधानसभा उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके यांच्याकडे केली. त्या वेळी उद्भवलेल्या गोंधळातून सभागृहाचे कामकाज पंचवीस मिनिटांसाठी तहकूब करण्याचा निर्णय पुरके यांनी घेतला.

सरकारला नुकसानभरपाईसाठी द्यावयाच्या पैशाचा विचार करावा लागेल. त्यामुळे तेवढा अवधी सरकारला द्यावी, अशा शब्दांत पुरके यांनी सदस्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यावर समाधान न झाल्याने विजय वडेट्टीवार, बच्चू कडू आदी आमदारांनी थेट पुरके यांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेतच धाव घेत विदर्भावरील अन्याय दूर करण्याची मागणी केली. तरीही पतंगराव निर्णयावर ठाम राहिले. त्यामुळे विरोधकांची घोषणाबाजी सुरूच राहिल्याने सभागृहाचे कामकाज आणखी तीनदा तहकूब करावे लागले.

मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप व्यर्थ
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपण येत्या शनिवार-रविवारी विदर्भाचा दौरा करून मदतीसंदर्भात सोमवारी सभागृहात निवेदन करण्याचे आश्वासन दिले, पण सरकार याबाबत वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत आमदारांनी पुन्हा अध्यक्षांच्या आसनाकडे धाव घेतली. पुरके यांनी विरोधकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण मदतीसंदर्भात तत्काळ निर्णय घेण्याची मागणी करत विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्या गोंधळातच पुरवणी मागण्या संमत करण्यात आल्या.