आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सहकारमंत्र्यांविराेधात विराेधी पक्ष अाक्रमक, राजीनाम्याची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘लाेकमंगल’ संस्थेच्या ९१ लाख बेहिशेबी राेकडप्रकरणी या संस्थेचे प्रमुख तथा राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना सहकार विभागाने क्लीन चिट दिल्याची माहिती समाेर अाल्यानंतर विराेधक अाक्रमक झाले अाहेत. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याप्रमाणेच देशमुख यांचीही मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून त्यांची त्रयस्थ यंत्रणेमार्पत चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. त्यामुळे येत्या हिवाळी अधिवेशनात देशमुखांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधक सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत अाहेत.

पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून सरकारला धारेवर धरले होते. विधिमंडळाचे कामकाजही अनेकदा ठप्प केले होते. तेव्हा अापले मंत्री भ्रष्ट नाहीत, हे सांगण्यात मुख्यमंत्र्यांना बरीच ऊर्जा खर्च करावी लागली होती. अाता अागामी हिवाळी अधिवेशनात विरोधकांच्या रडारवर देशमुख असतील, हे आता स्पष्ट आहे.

‘देशमुख ज्या खात्याचे मंत्री आहेत त्याच खात्याचा एक कनिष्ठ अधिकारी मंत्र्यांची चौकशी काय करणार? मुख्यमंत्र्यांनी देशमुखांचा राजीनामा घेऊन संपूर्ण प्रकरणाची प्राप्तिकर खात्याकडून तसेच अंमलबजावणी संचलनालयाकडून चौकशी करावी’, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आजवर १८ मंत्र्यांना क्लीन चिट दिली आहे. आता बहुधा १९ व्या मंत्र्यालाही क्लीन चिट देतील, असा टोला विराेधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला.

आयुक्त दौऱ्यावर
राज्याचे निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया सध्या राज्याच्या दौऱ्यावर असल्याने सहकार मंत्री सुभाष देशमुखांबद्दल उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवलेल्या अहवालावर त्यांनी अद्याप विचार केलेला नाही. ते परत अाल्यावर यावर विचार करून त्यांच्यावर काय कारवाई करायची याचा निर्णय घेतील, असे सूत्रांनी सांगितले.

तटस्थ चाैकशी करा
‘मंत्रिपदावर असेपर्यंत देशमुखांची विश्वासार्ह चौकशी होणे शक्य नाही. खडसेंविरुद्ध भ्रष्टाचाराचे पुरावे समोर आल्यानंतर त्यांचा राजीनामा घेऊन जशी न्यायालयीन चौकशी लावली तशीच तटस्थ चौकशी देशमुखांची करावी,’ अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली .

बेनामी संपत्तीचा गुन्हा दाखल करा : काँग्रेस
‘नोटबंदीच्या निर्णयानंतर काळ्या पैशावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने बेनामी संपत्तीविरोधी कायदा आणला आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल ग्रुपच्या गाडीत सापडलेली रक्कम हाही काळा पैसा आहे. त्यांच्यावर या कायद्यानुसार राज्यातील पहिला गुन्हा दाखल करावा,’ अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. सहकारमंत्री देशमुख यांच्या लोकमंगल बँकेच्या गाडीतून निवडणूक आयोगाने जप्त केलेली संपूर्ण रक्कम चलनातून बंद केलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांमध्ये आहे. याबाबत सुभाष देशमुख यांनी केलेले खुलासेही समाधानकारक नसून दिशाभूल करणारे आहेत. हा पैसा काळा पैसा असून मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळेच देशमुखांवर कारवाई होत नसल्याचा आरोपही काँग्रेसने केला.
बातम्या आणखी आहेत...