आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पमतातील सरकार बरखास्त करा, विरोधक करणार मागणी, तर भाजपचे विरोधकांना आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अल्पमतातील भाजप सरकार बरखास्त करून नव्याने विश्वादर्शक ठराव घ्यायला हवा. भाजप सरकार वाचवण्याचा जो काही प्रकार झाला तो घटनेला धरून नव्हता. मतदानाची मागणी करत असताना विधानसभा अध्यक्षांनी आवाजी मतदानाने ठराव पास केला. हे योग्य नसून आम्हाला न्याय द्या, अशी मागणी राज्यपालांकडे करण्याचा निर्णय शिवसेना तसेच काँग्रेसच्या आमदारांनी बुधवारी घेतला.

विधिमंडळात मतदान पद्धतीने विश्वासदर्शक ठराव झाला असता तर भाजपच्या बाजूने किती सदस्य आहेत, हे स्पष्ट झाले असते. पण, तसे झाले नाही. हात उंचावून भाजपच्या सदस्यांनी ठरावाला मंजूरी दिली. ही लोकशाहीची हत्या आहे. यासंदर्भात आम्ही राज्यपालांना भेटणार आहोतच, पण न्यायालयातही जाण्याची तयारी आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते रामदास कदम यांनी व्यक्त केली.

काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे म्हणाले, आमचा आवाजी मतदानाला विरोध होता, आम्ही थेट मतदानाची मागणी करत होतो. अध्यक्षांच्या समोर जाऊन आम्ही उभे असताना गोंधळात अध्यक्षांनी भाजप सरकारला जीवदान दिले. लोकशाहीतील हा सर्वात काळा दिवस आहे. फडणवीस सरकार घटनाबाह्य असून भाजपने पुन्हा एकदा बहुमत सिद्ध करून दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले.
विरोधकांनी अविश्वासाचा ठराव आणूनच दाखवावा, फडणवीस यांचे आव्हान
आपले सरकार बहुमत सिद्ध करू शकले नाही, असा कांगावा करणा-या विरोधकांनी आपल्या सरकारविरुद्ध अविश्वासाचा ठराव आणावा, असे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिले. त्याचवेळी कामकाजाच्या विषय पत्रिकेत विरोधी पक्षनेत्यांच्या नियुक्तीचा विषय आयत्या वेळी कसा आणला गेला याची चौकशी करण्याची मागणीही आपण केली असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारने नियमानुसार बहुमत पार पडले. विश्वासदर्शक ठराव मांडताना सर्व नियमांचे पालन केले आहे. काँग्रेसला जर आमचे सरकार बेकायदेशीर वाटत असेल, तर त्यांनी खुशाल अविश्वास प्रस्ताव मांडावा अथवा राज्यपाल, राष्ट्रपती, उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात जावे, आम्ही अविश्वासाच्या ठरावाला सामोरे जाण्यास तयार आहोत. आमचे हितचिंतक सर्वच पक्षात आहेत. त्यामुळे आमच्याकडे बहुमत आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शिवसेनेबाबत प्रेम!
फडणीसांनी शिवसेनेवर टीका करण्याचे जाणीवपूर्वक टाळले. ते म्हणाले, शिवसेनेने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला असला तरी आम्ही पुढील सहा महिन्यात बहुमत सिद्ध करू, आम्ही शिवसेनेशी वाटाघाटी करण्याचे थांबवलेले नाही. हिवाळी अधिवेशनाच्या आधीच मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे.