आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालन्‍यात स्‍वच्‍छतागृहाला अजित पवारांचे नाव, राजीनाम्‍याच्‍या मागणीवर विरोधक ठाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुष्काळग्रस्तांची टर उडवणार्‍या वक्तव्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सोमवारी विरोधकांनी गोंधळ घातला. पवार यांनी माफी मागितली तरीही विरोधक शांत झाले नाहीत, माफी नको, राजीनामाच द्या, या मागणीने त्यांनी विधिमंडळ दणाणून सोडले. तत्पूर्वी, विधान भवनाबाहेरही आमदारांनी निदर्शने करत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना घेराव घातला.

विरोधकांच्या घोषणाबाजीनेच विधानसभेचे कामकाज सुरू झाले. प्रश्नोत्तरांचा तास झाल्यानंतर बोलण्याची संधी देतो, असे विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. परंतु वक्तव्यावर चर्चा घ्यावी, अशी मागणी भाजप आमदार गिरीश बापट यांनी केली. गोंधळ सुरूच राहिल्याने कामकाज अर्धा तास तहकूब करण्यात आले. स्थगन प्रस्तावाद्वारे यावर चर्चा घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली. पण हा विषय ‘स्थगन’च्या कक्षेत येत नसल्याचे सांगत पीठासन अधिकारी म्हणाले.

विधान परिषदेत चर्चेचा प्रस्ताव नाकारला
विधान परिषदेतही विरोधकांनी स्थगन प्रस्तावान्वये चर्चेची मागणी केली. सभापती शिवाजीराव देशमुख यांनी त्यास परवानगी नाकारली. मात्र सकाळपासून दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी गदारोळ घातल्याने 7 वेळा कामकाज तहकूब करावे लागले. अजित पवार यांनी वक्तव्याबद्दल सभागृहाची माफी मागितली.

जालन्यात स्वच्छतागृहाला पवारांचे नाव
जालना शहरात चमन भागातील एका सार्वजनिक स्वच्छतागृहाला सोमवारी अजित पवार यांचे नाव देण्यात आले. आम आदमी पार्टीच्या वतीने पवारांच्या वक्तव्याचा असा निषेध करण्यात आला.

माझ्या राजकीय जीवनातील सर्वात मोठी चूक : अजित पवार
गेली अनेक वर्षे मी राजकीय जीवनात आहे. चढ-उतार येत असतात. शनिवारी एका कार्यक्रमात मी केलेले वक्तव्य माझ्या राजकीय जीवनातील सर्वात मोठी चूक आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी सभागृहाबाहेर पत्रकारांजवळ व्यक्त केली. उच्च पदावरील व्यक्तीला शब्द जपून वापरणे आवश्यक असते. माझ्याकडून चूक झाली आहे. यापुढे शब्द जपून वापरीन. मी वापरलेल्या शब्दाबद्दल महाराष्ट्रातील जनतेची माफी मागतो आणि जनता मला माफ करील असा विश्वास आहे, असे ते म्हणाले.

पवारांविरुद्ध पोलिसात तक्रार
पुणे । अजित पवार यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. भारत अगेन्स्ट करप्शन या स्वयंसेवी संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दिली आहे. पोलिसांनी वक्तव्याची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही, तर जनहित याचिका दाखल करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. मुंबई पोलिस कायदा कलम 2, 3, 4 अन्वये प्रक्षोभक, भावना भडकावणारी विधाने करणे गुन्हा ठरतो, असे तक्रारीत म्हटले आहे.

पुरस्कार परत करून निषेध
बारामती । पंढरपूर तालुक्यातील आढीवचे शेतकरी भारत श्रीपाद रानरुई यांनी अजित पवार यांच्या हस्ते मिळालेला शेतीनिष्ठ पुरस्कार त्यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून शासनाला परत करण्याचा निर्णय घेतला आहे. पंढरपूरच्या तहसीलदारांकडे मंगळवारी ते 11 हजार रोख, चांदीचे पदक व प्रशस्तिपत्र परत करणार आहेत. 2003 मध्ये त्यांना पुरस्कार मिळाला होता. शेतकर्‍यांची सुख-दु:खे जाणणार्‍या शरद पवार यांच्या पुतण्याच्या हस्ते पुरस्कार मिळाल्याचा आनंद तेव्हा झाला होता, असे रानरुई यांनी म्हटले आहे.