आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवारांच्या आत्मक्लेशाला विरोधकांनी ठरवले ‘नौटंकी’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदापूर तालुक्यातील सभेत दुष्काळग्रस्तांबद्दल बेताल वक्तव्य करणार्‍या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आठ दिवसांनंतर आत्मक्लेश करण्याची उपरती आली आहे. मात्र, त्यांच्या या भूमिकेचे त्यांचाच पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसने सर्मथन केले असले तरी विरोधी पक्षांनी मात्र ‘नौटंकी’ म्हणत खिल्ली उडविली आहे. ‘अजित पवारांना खरोखरीच पश्चात्ताप असेल तर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन दुष्काळग्रस्तांची सेवा करावी, तरच जनता त्यांना माफ करेल,’ अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. काँग्रेसने मात्र या वादावर मौन बाळगणेच पसंत केले.

बूंद से गयी, हौद से नहीं आती
आता पश्चात्तापाचा काय उपयोग? लोकांच्या दुखावलेल्या भावना या उपोषणामुळे भरून निघणार नाहीत. अशी नौटंकी करून सर्व परिस्थिती नीट होणार नाही. बूंद से गयी वो हौद से नहीं आती. राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

आता तरी सुबुद्धी सुचेल
यशवंतराव चव्हाण यांच्या पायाशी बसून तरी सुबुद्धी येईल. अजित पवारांना यांची वृत्ती उर्मटपणाची आहे. आजवर त्यांच्यामुळे शरद पवारांना आजवर तीन वेळा जाहीर माफी मागावी लागली. अजित पवार हे हुकूमशहा असल्यासारखे वागतात. गोपीनाथ मुंडे, ज्येष्ठ नेते भाजपा

यशवंतरावांनाही क्लेश
अजित पवारांनी जनतेची क्रूर थट्टा केली आहे. आपल्याला पश्चाताप असल्याचे ते भासवत असले तरी जनता मूर्ख नाही, त्यामुळे त्यांना कधीही माफी मिळणार नाही. पवारांच्या आजच्या नाटकामुळे यशवंतराव चव्हाणांनाही ‘क्लेश’ झाला असेल. उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख.

वाद संपायला हवा
आपली चूक स्वीकारणे ही मोठी गोष्ट असून त्यासाठी मोठे मन लागते. त्यामुळे विरोधकांनी अजित पवार यांच्या उपोषणाचे राजकारण करू नये. ‘त्या’ वक्तव्यानंतर पवारांनी लगेचच माफी मागितली होती. यानंतर हा वाद संपायला हवा होता. नवाब मलिक, प्रवक्ते राष्ट्रवादी कॉँग्रेस

दुष्काळग्रस्तांची सेवा करा
अजित पवार यांनी केलेली चूक मोठी असून केवळ आत्मक्लेशाने भागणार नाही तर त्यांना राजीनामा द्यावा लागेल. पदाचा त्याग करून, सत्तेपासून दूर जाऊन दुष्काळी भागातल्या जनतेसाठी काम करणे हाच त्यांच्यासाठी पश्चात्ताप असेल. विनोद तावडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

अर्धे नाटक, अर्धा आत्मक्लेश
अजित पवारांची आजची कृती म्हणजे 50 टक्के नाटक आणि 50 टक्के आत्मक्लेश आहे. टगे लोक कधी माफी मागत नाहीत. रामदास आठवले, रिपाइं नेते

लबाड लांडगं ढोंग करतंय!
अजित पवारांचा आत्मक्लेश हा केवळ देखावा आहे. प्रत्यक्षात आपल्या बोलण्याचा पश्चात्ताप करण्यासारखी पवार घराण्याची मानसिक स्थिती नाही. ज्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात लोकांचे शोषण करण्यापलीकडे कोणताही उद्योग केला नाही, अशा लोकांना कधी आपल्या बोलण्याचा किंवा कृत्याचा पश्चात्ताप होईल, यावर सर्वसामान्य जनता कधीच विश्वास ठेवणार नाही. बंडातात्या कराडकर, ज्येष्ठ कीर्तनकार तथा संस्थापक, व्यसनमुक्त युवक संघ

मंत्रिपदाची झूल बाजूला ठेवा
अजित पवारांचे हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे. त्यांना खरोखरच पश्चात्ताप होत असेल तर सर्वप्रथम मंत्रिपदाची झूल बाजूला ठेवून आत्मक्लेशासाठी दुष्काळग्रस्तांची सेवा करावी. दुष्काळग्रस्तांनी माफ केल्यावरच पुन्हा सत्तेत यावे. एक दिवसाच्या आत्मक्लेशाने पाणी मागणार्‍या शेतकर्‍यांचा अपमान भरून निघणारा नाही. केवळ माफी मागून किंवा एक दिवसाचा आत्मक्लेश करून शेतकर्‍यांच्या जखमा भरणार नाहीत. राजू शेट्टी, खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना

पवारांना माफी नाहीच
उजनी धरणातील पवित्र पाण्याची अजित पवारांनी खिल्ली उडवून त्याचा अपमान केला आहे. त्यांना आम्ही कधीच माफ करणार नाही. त्यांचे आत्मक्लेश वगैरे हे सर्व ढोंग आहे. खरोखरच वक्तव्याचा पश्चात्ताप होत असेल तर दुष्काळी जनतेची तहान भागवून माफी मागावी. प्रभाकर देशमुख, उपोषणकर्ते, सोलापूर

प्रायश्चित्ताचे प्रदर्शन
शरद पवार राजकीय गुरू असलेल्या अजित पवारांनी आत्मक्लेशासाठी यशवंतराव चव्हाणांचे समाधिस्थळ का निवडले, हा प्रश्न आहे. यशवंतरावांचे वेगळेपण त्यांच्या सार्वजनिक नैतिकतेमध्ये होते. निधनानंतर त्यांच्या नावावर केवळ राहते घर आणि ग्रंथसंपदाच होती. अजित पवार यांना यशवंतरावांचे हे वैशिष्ट्य आत्मसात करता येईल का ? खरोखरच त्यांना आत्मक्लेश झाला असता तर परंपरेप्रमाणे बंद खोलीत मौन साधून 11 दिवस चिंतन करायला हवे. तसे केले असते तर त्यांना राजीनाम्याचीही बुद्धी झाली असती; परंतु त्यांनी मीडियासमोर प्रदर्शनात्मक प्रायश्चित्त घेतले. डॉ. कुमार सप्तर्षी, युक्रांद

वर्तनातून सिद्ध होईल
गांधीजी आत्मशुद्धीसाठी उपोषण करत. त्यामुळे त्यांचे जीवन अधिक पवित्र बनत असे. माफी मागून वादळ शमत नाही म्हणून अजित पवारांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला दिसतो. तो राजकीय आहे की खरोखर आत्मशुद्धीचा प्रयत्न आहे हे ठरवणे अवघड आहे. तो राजकीय पवित्राही असू शकतो किंवा प्रामाणिकपणाही. त्यांच्या पुढच्या वर्तनावरच यातले नेमके सत्य काय हे सिद्ध होईल. डॉ. भाई वैद्य, ज्येष्ठ समाजवादी नेते

संशय घेता कामा नये
एका अर्थाने बरे वाटले. जुना गांधीवादी मार्ग मागे पडला होता. महात्मा गांधी, शंकरराव देव, सेनापती बापट ही मंडळी आत्मक्लेशासाठी उपोषण यासारख्या गोष्टी करत. अजित पवार यांच्या रूपाने या खंडित झालेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन होत आहे, हे चांगलेच झाले. गांधीवादी भूमिकेचा मार्ग अनुसरत पवारांनी झालेल्या चुकीचे परिमार्जन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या कृतीबद्दल लगेच संशय व्यक्त न करता त्यांच्या या प्रयत्नाकडे सकारात्मक भूमिकेतून पाहायला हवे. डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ तत्त्वज्ञ