आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चैत्यभूमीवरही चर्चा आत्मक्लेशाचीच!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कराडमधील आत्मक्लेश आंदोलनाचे पडसाद रविवारी चैत्यभूमीवरही उमटले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्यासाठी आलेल्या सर्वपक्षीय पुढार्‍यांना पत्रकारांनी ‘आत्मक्लेश आंदोलनाबद्दल तुमचे मत काय?’ हाच एकमेव प्रश्न विचारून भंडावून सोडले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 122 व्या जयंतीचे निमित्त साधून चैत्यभूमी स्मारकाच्या टपाल तिकीट प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री, डझनभर मंत्री, खासदार, आमदार, रिपब्लिकन नेते उपस्थिती लावणार होते. त्यामुळे प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी मोठी गर्दी केली होती.

हा विषय संपवावा : ढोबळे
‘त्या’ वक्तव्याबाबत सदनाबाहेर आणि सदनांमध्ये अजितदादांनी तीनवेळा माफी मागितली आहे. आज त्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या समाधीजवळ आत्मक्लेशही करवून घेतले आहेत. त्यामुळे माध्यमांनी आता हा विषय संपवावा, अशी विनंती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केली.

कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे म्हणाले की, अजित पवार इंदापूर तालुक्यात जे बोलले, ते नि: संशय चुकीचे होते. आता ते आत्मक्लेश करवून घेताहेत, हे चांगलेच झाले; परंतु त्यांनी राजीनामा द्यावा की नाही, हा राष्ट्रवादी पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. तर रिपाइं नेते रामदास आठवले यांनी मात्र हे पवारांचे नाटक असल्याचे म्हटले.

अजेंड्यावरचे विषय संपले
मागील 14 एप्रिलला इंदू मिल आंदोलन भरात होते. त्यामुळे आनंदराज आंबेडकर आणि रामदास आठवले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चैत्यभूमीवर धुमश्चक्री उडाली होती. इंदू मिलची घोषणा झाल्याने रिपब्लिकन चळवळीच्या अजेंड्यावरील विषय संपले आहेत. त्यामुळे चैत्यभूमीवरील वातावरण आज नरम होते.