आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opposition Leader Eknath Khadse Blame On Congress And Nationalist Congress Party

निधीचे लाभार्थी फक्त काँग्रेस-राष्ट्रवादीच!, एकनाथ खडसे यांचा आरोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- वडिलोपार्जित मालमत्ता असल्याप्रमाणे सत्ताधारी पक्ष निधीचे वाटप करतात. राज्याच्या पैशापैकी अर्धा वाटा राष्ट्रवादी काँग्रेस, तर निम्मा वाटा काँग्रेसच्या आमदारांना जातो. विरोधकांना मात्र विकासकामांसाठी काहीही निधी मिळत नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी मंगळवारी विधानसभेत केला.

महाराष्ट्र विनियोजन विधेयक संमतीसाठी विधानसभेत आले असता आमदारांचा विकासनिधी वाढवून देण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.


यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार निधीत वाढ करण्याची, आमदार व त्यांच्या स्वीय सहायकांची पगारवाढ करण्याची, त्यांच्या मोफत विमानप्रवासांत वाढ करण्याची मागणी केली. त्यावेळी वेतन व भत्त्यांसंदर्भात विधिमंडळाने नियुक्त केलेल्या समितीच्या शिफारशींनंतर यासंदर्भात निर्णय घेण्यात येतात, असे उत्तर अर्थ राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी दिले. त्यावर अर्थ राज्यमंत्री सभागृहाची दिशाभूल करत आहेत. कारण, आमदार निधीत वाढ करण्याचा निर्णय समितीकडून नव्हे, तर सरकारकडून घेतला जातो, असे सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांना सांगितले.

राज्याच्या तिजोरीत जास्त महसूल येत असल्याचे एकीकडे सांगितले जात असताना आमदार निधीत वाढ करण्याचा निर्णय का होत नाही? विकासकामे करण्यासाठी तातडीने या निधीत वाढ करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पवारांच्या भाषणावर विरोधकांचा बहिष्कार
कामकाज वाढवण्यासंदर्भात विरोधकांकडून मागणी होत आहे. त्याला उत्तर देण्यासाठी अजित पवार उठले असता विरोधक सभागृहाबाहेर पडले व त्यांचे उत्तर संपल्यानंतर परत आले. आमदारनिधी वाढीबाबत उत्तर देणा-या अर्थ राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांना सकारात्मक उत्तर देण्याची विनंती सुधीर मुनगंटीवार यांनी केली. आपण उत्तर देत आहात, ही चांगली गोष्ट आहे. अजितदादांचे उत्तर आम्ही ऐकू शकलो नसतो. त्यांच्याप्रमाणेच विरोधकांचाही आत्मक्लेश सुरू आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.