आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवारांवर विरोधकांचा ‘बहिष्कार अस्त्र’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात विधानसभेत निंदाव्यंजक ठराव मांडण्याचा आणि त्यावर मुख्यमंत्र्यांना माफी मागायला लावण्याचा प्रयत्न मंगळवारी विरोधकांनी केला. मात्र मुख्यमंत्र्यांच्या निवेदनास पवारांनीच विरोध केला. त्यामुळे आक्रमक विरोधकांनी पवारांशी संबंधित कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.


पवार यांनी सभागृहात, माध्यमांसमोर माफी मागितली. त्यामुळे हा प्रश्न संपवावा, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे मत होते. मात्र विरोधकांनी राजीनाम्याची मागणी लावून धरली. सभागृहात निंदाव्यंजक ठराव मांडण्याचा प्रयत्न करत गोंधळ केला. अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी त्यांचा ठराव फेटाळून लावला. विरोधकांनी पाच वेळा काम बंद पाडले व शेवटी दिवसभरासाठी सभागृह तहकूब करण्यात आले.


मुख्यमंत्र्यांची तयारी, पवारांचा विरोध
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्यात सोमवारी रात्री बैठक झाली. त्यात विरोधकांनी मंगळवारी निंदाव्यंजक ठराव आणून मुख्यमंत्र्यांना माफी मागायला लावणार, असेही सांगितले. मुख्यमंत्र्यांनी माफी मागण्याचे मान्य केले. सभागृहात निवेदन देण्यास ते तयार झाले. विरोधकांनी रणनीती आखली. मात्र अजित पवार यांनी ठराव व मुख्यमंत्र्यांच्या निवेदनास विरोध केला.


निंदाव्यंजक ठराव काय
० निंदाव्यंजक ठराव हा अपवादात्मक परिस्थितीमध्येच मांडला जातो.
० गेल्या 40 वर्षांत असा ठराव विधिमंडळात मांडला गेला नव्हता.
० आणखी बदनामी होऊन राजकीयदृष्ट्या पवार अडचणीत आले असते.


महायुती शुक्रवारी रस्त्यावर
पवार यांच्या राजीनाम्यासाठी महायुती शुक्रवारी तालुके व जिल्हास्थानी त्यांच्या पुतळ्याचे दहन करणार आहे. त्यास मनसे पाठिंबा देणार असल्याचे समजते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.


शरद पवार आज मुंबईत
राष्‍ट्रवादीचे अध्यक्ष केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी जनक्षोभ शांत करण्यासाठी मोर्चेबांधणी चालवली आहे. दिल्लीतील प्रस्तावित शासकीय किंवा खासगी बैठका, पक्ष मेळावा रद्द करत त्यांनी सोमवारी बारामती गाठले. बुधवारी ते मुंबईस्थित पक्ष कार्यालयात ठिय्या मारणार आहेत.