आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवारांची माफी धुडकावली, विरोधक राजीनाम्‍याच्‍या मागणीवर ठाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- दुष्काळग्रस्तांबाबत बेताल वक्तव्य करणा-या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला. पवारांनी सभागृहाची माफी मागितली, मात्र ती सपशेल धुडकावून लावत विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याचीच मागणी केली. या गोंधळात विधानसभेचे कामकाज पाच वेळा तहकूब करावे लागले.

सकाळी अकरा वाजता विरोधकांच्या घोषणाबाजीनेच विधानसभेच्या कामकाजास सुरुवात झाली. प्रश्नोत्तरांचा तास झाल्यानंतर बोलण्याची संधी देतो, असे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी विरोधकांना सांगितले. परंतु, उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानामुळे राज्यातील जनता संतप्त झाली असून दुष्काळग्रस्तांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम त्यांनी केले आहे. या प्रश्नी जनतेच्या भावना तीव्र असल्यामुळे त्यावर चर्चा घ्यावी, अशी मागणी भाजप आमदार गिरीष बापट यांनी केली. ती मागणी मान्य न झाल्याने विरोधकांनी गोंधळ केला, त्यामुळे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आले. साडेअकराच्या सुमारास सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाले, तरी विरोधक भूमिकेवर ठाम असल्याने पीठासीन अध्यक्ष नवाब मलिक यांनी कामकाज तासाभरासाठी तहकूब केले.
कामकाज सुरू झाल्यानंतर अजित पवारांनी माफी मागितली, मात्र विरोधकांनी ती धुडकावून लावली. 'माफी नको, राजीनामा द्या' या घोषणेवर विरोधक ठाम राहिल्यामुळे कामकाज पुन्हा अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आले. या वेळात तीनदा कामकाज तहकूब करावे लागले.

दुपारी दोन वाजता विरोधकांच्या गोंधळातच कामकाजास सुरुवात झाली. देवेंद्र फडणवीस, योगेश सागर, नाना पटोले हे थेट अध्यक्षांच्या समोरील पीठासीन अधिका-यांच्या जागेवर उभे राहून चर्चेची मागणी करत होते. त्यावेळी सर्व विरोधक वेलमध्ये जमा होऊन पवार यांच्याविरोधात घोषणा देत होते. दरम्यान, कामकाज सुरू होण्यापूर्वीच विधान भवनाच्या प्रवेशद्वारावरही आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘टगेगिरी नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, माफी नको, राजीनामा द्या’, अशा घोषणा विरोधकांनी दिल्या.

अध्यक्षांसमोर कागदे भिरकावली
विरोधी पक्षांमधून अध्यक्षांच्या टेबलासमोर कागद भिरकावण्यात येत होते. योगेश सागर आणि संजय कुटे व्यासपीठावरून चढून घोषणाबाजी करू लागले. त्याला प्रत्त्युत्तर म्हणून दुसºया बाजूला सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे आदी उभे राहून ओरडायला लागले. या गोंधळातच सभागृहाचे कामकाज रेटले जात असतानाच अर्थ राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी करसुधारणाविषयक विधेयक मांडले.