आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुफळीने विरोधकांचा अधिवेशनात कस, मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पाच डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या ५५ व्या हिवाळी अधिवेशनात खरी कसोटी विरोधकांचीच आहे. काँग्रेसमधील दोन मोठ्या नेत्यांत सुरू असलेला वाद, नारायण राणे यांनी वरिष्ठांवर केलेले आरोप, राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सुरू असलेले बंदूक, तलवार युद्ध यामुळे दोन्ही पक्षांतील नेते त्रस्त आहेत. विरोधकांच्या या दुफळीमुळे मुख्यमंत्री मात्र निश्चिंत असून अधिवेशन सुरळीत पार पडेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांना वाटत आहे.

प्रत्येक अधिवेशनात विरोधक राज्य सरकारला जनतेच्या विविध प्रश्नांवरून धारेवर धरण्याचा प्रयत्न करतात. परंतु भाजप-शिवसेना सत्तेवर आल्यापासून विरोधक निष्प्रभ झाल्याचेच दिसून येत आहे. शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक आक्रमक होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी पॅकेज जाहीर करून विरोधकांना धोबीपछाड दिली. अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी विरोधकांची नुकतीच एक बैठक मुंबईत झाली.

या बैठकीची माहिती देताना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले, शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सुटलेल्या नाहीत. पीक कर्जाची रक्कम त्यांना अजून मिळालेली नाही. फक्त पाऊस चांगला पडला म्हणजे शेतकरी सुखी होतात असे नाही. सरकारकडून विविध उपाययोजना आखल्या गेल्या; परंतु त्याचा लाभ शेतकऱ्यांना झाला नाही. शेतकरी अजूनही आत्महत्या करत आहेत. त्यामुळे सरकारला यावरून आम्ही धारेवर धरणार आहेत. तसेच गृह विभाग मुख्यमंत्र्यांकडेच असून मुख्यमंत्र्यांच्याच नागपूरमध्ये अनेक गुन्हे घडत आहेत. भरदिवसा गोळीबार होतो, महिलांवर हल्ले होतात. यावरून गृह विभागाचा गुन्हेगारांवर वचक नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या वेळी गृह विभागाच्या कामामुळे आम्ही सरकारला जाब विचारणार आहोत. पाळणाघरामध्ये महिला लहान मुलांना मारहाण करतात. राज्यात पाळणाघरातील मुले सुरक्षित नाहीत. हा मुद्दाही आम्ही अधिवेशनात उचलणार आहोत. याशिवाय मराठा आरक्षण, धनगर आरक्षण आदी मुद्देही आम्ही उपस्थित करणार आहोत.
अधिवेशन सुरळीत पार पडेल
दुसरीकडे सत्ताधारी मात्र निश्चिंत आहेत. भाजपमधील एका मंत्र्याने सांगितले, दोन आठवड्यांचे हे अधिवेशन अत्यंत सुरळीत पार पडेल यात आम्हाला शंका नाही. विदर्भासाठी राज्य सरकार विशेष योजना या वेळी जाहीर करणार असून विदर्भातील जनतेला जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जे विरोधक आम्हाला कोंडीत पकडण्याच्या बाता करीत आहेत तेच एकमेकांचे पाय खेचत आहेत. काँग्रेसमध्ये काहीही आलबेल नसून त्यांचे नेतेच एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. राष्ट्रवादीतही तीच स्थिती आहे. ते आपसातच लढत असल्याने आमच्यावर टीका करण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नाही, असेही या मंत्र्याने सांगितले.
बातम्या आणखी आहेत...