आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफीच्या मुद्यानंतर विरोधक आता धनगर आरक्षणावरून आक्रमक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शेतक-यांची कर्जमाफी करावी या मागणीसाठी मागील आठवडाभर पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजात व्यत्यय आणणा-या विरोधकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी जोरदार हल्लाबोल करीत प्रत्त्युत्तर दिल्यानंतर विरोधकांनी आपला मोर्चा आता धनगर आरक्षणाकडे वळविला आहे. आज विधानभवनाच्या बाहेर 'येळकोट येळकोट जय मल्हार' अशा घोषणा देत विरोधक धनगर आरक्षणावरून सरकारविरोधात आक्रमक झाले.
'धनगर आरक्षण हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे' अशा घोषणा देतानाच विरोधक विधीमंडळात चक्क धनगर वेश परिधान करून आले होते. विधीमंडळात चर्चेच्या दरम्यानही विरोधकांनी धनगरांच्या पोशाख परिधान केला होता. राधाकृष्ण विखे पाटलांनी धनगर आरक्षणावरून सरकारवर टीका केली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, अजित पवार, प्रकाश शेंडगे, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, सुनील तटकरे, रामराव वडकुते, रमेश माने, अब्दुल सत्तार यांच्यासह अनेक विरोधक आमदार उपस्थित होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे आपल्या आजीचे निधन झाल्याने अनुपस्थितीत होते.
आपल्याला माहित असेलच की, विरोधकांनी शेतक-यांच्या कर्जमाफीवरून मागील आठवड्यातील विधीमंडळातील कामकाजात व्यत्यय आणला होता. शेतकरी प्रश्नांवरून फडणवीस सरकारची कोंडी करण्यात विरोधक पहिल्या आठवड्यात यशस्वी झाले होते. मात्र, आघाडी सरकारने मागील 15 वर्षात घातलेल्या गोंधळांचा उत्तम गृहपाठ करून आलेल्या मुख्यमंत्री फडणवीसांनी सोमवारी विधानसभेत निवेदन करताना विरोधकांना घायाळ केले. शेतक-यांची कर्जमाफी करणार नाही तर त्यांना कर्जमुक्ती देणार आहे असे ठासून सांगताना सहकारी संस्था लुटून खाल्यानेच शेतकरी उद्धवस्त झाल्याचा घाणाघाती टीका केली.
ज्या शेतक-यांना कर्जमाफी द्यावी असे तुम्ही पोडतिकडीने सांगता त्यांच्यावर आत्महत्येची वेळ कोणी आणली ते सांगा? सहकारी बॅंका माध्यमातून आपल्या संस्थांची भरभराट केली पण शेतक-यांना काय फायदा झाला त्याची उत्तरे द्या असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2009 ते 2014 या काळात (केंद्र सरकारने संपूर्ण कर्जमाफी केल्यानंतरचा काळ) 9 हजार 614 शेतक-यांनी आत्महत्या का केल्या याचे उत्तर द्या मगच कर्जमाफीची मागणी करा असेही फडणवीसांनी विरोधकांना सुनावले होते.
विदर्भ-मराठवाड्यात 60 लाख शेतकरी आहेत. मात्र त्यातील 25 लाख शेतक-यांनीच केवळ कर्जे घेतली आहेत. मग राहिलेल्या 35 लाख शेतक-यांचे काय करायचे, त्यांना आपली कोणतेही व्यवस्था कर्ज देत नाही. मागील काळात जी कर्जमाफी झाली त्यातून शेतक-यांना नव्हे तर नेत्यांना व त्यांच्या बॅंकानाच झाला असेही फडणवीस यांनी ठासून सांगितले होते. या दरम्यान, विरोधकांकडे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेण्याशिवाय पर्याय नव्हता. राज्यातील जनताही मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर समाधानी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे विरोधकांनी एका रात्रीतच शेतक-यांचा मुद्दा सोडून अचानक धनगर आरक्षण देण्याची मागणीकडे आपला मोर्चा वळविला. आता मुख्यमंत्री फडणवीस हे धनगर आरक्षणाचा गृहपाठ करून हे अस्त्र विरोधकांवरच बूमरॅंग करणार का याकडे लक्ष आहे.
पुढे पाहा, धनगर वेशात विधीमंडळात आलेले विरोधक आमदार...
बातम्या आणखी आहेत...