आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीस सरकार अडचणीत अाणण्याची विराेधकांची खेळी, असे असतील राजकीय डावपेच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - यंदाचे राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता अाहे. मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीवर फडणवीस सरकारचे स्थैर्य अवलंबून आहे. मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमधील दरी आणखी रुंदावल्यास त्याचा फायदा उचलण्याची रणनीती विधिमंडळातील विरोधी पक्षांकडून आखली जात आहे.
 
म्हणूनच भाजपकडून दुखावलेल्या शिवसेनेची साथ मिळाल्यास अर्थसंकल्पीय अधिवेशनात ऐनवेळी एखाद्या वित्तीय विधेयकावर मतदान मागून सरकारला अडचणीत आणण्याची खेळी विरोधकांकडून खेळली जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
 
मुंबईच्या महापौरपदाचा फैसला नऊ मार्चला होणार आहे. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी महापौरपदासाठी आपापली शक्ती पणाला लावली आहे. मात्र वेगाने बदलत असलेल्या या राजकीय घडामोडींमध्ये शिवसेनेकडून महापाैरपद हिसकावले गेल्यास त्याचा परिणाम राज्य सरकारच्या स्थैर्यावर होण्याची शक्यता आहे. विधिमंडळात विरोधी बाकांवर असलेल्या काँग्रेस आघाडीद्वारे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न केले जाण्याचे संकेत मिळत आहेत.   
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारविरोधात थेट अविश्वास ठराव आणण्याऐवजी अस्वस्थ शिवसेनेची साथ मिळाल्यास विरोधक अर्थसंकल्पीय अधिवेशनात एखाद्या वित्तीय विधेयकावर मतदान मागण्याची शक्यता आहे. कारण वित्तीय विधेयकावरील मतदानात विधेयकावर बहुमत प्राप्त न झाल्यास तो सरकारवरील अविश्वास असल्याचे मानले जाते. अशाच पद्धतीने यापूर्वी पंतप्रधानपदी असलेल्या चंद्रशेखर यांचे केंद्रातील सरकार कोसळले होते. त्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेला न डिवचण्याचे धोरण भाजपद्वारे अवलंबले जाण्याची शक्यता आहे.    
 
महापौर निवडणुकीत काय होणार? : मुंबईच्या महापौरपदासाठी येत्या ८ मार्चला उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत.  एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास ९ मार्चला मतदान होईल. सध्याचे राजकीय चित्र पाहता शिवसेना, भाजप आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी आणि सपा आघाडीचा प्रत्येकी एक अशा तीन उमेदवारांकडून अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. मतदान झाल्यास भाजप किंवा शिवसेना यापैकी कुणालाही मतदान न करता काँग्रेस, सपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण ४४ नगरसेवक अाघाडीच्या उमेदवाराला मतदान करतील. अशा परिस्थितीत सध्या गळाला लागलेले चार अपक्ष नगरसेवक आणि मनसेची साथ मिळाल्यास शिवसेनेचा महापौर निवडून येण्याची शक्यता अधिक आहे.   
 
विराेधकांची रणनीती : शिवसेनेचा महापौर झाल्यास शिवसेना राज्य सरकारमधून बाहेर पडण्याबाबत साशंकता व्यक्त हाेत अाहे. मात्र महापाैरपद हातून गेल्यास संतापलेल्या शिवसेनेची साथ विरोधकांना विधिमंडळात मिळू शकेल, असा विरोधकांचा अंदाज आहे. नेमका याच संधीचा फायदा उचलून अर्थसंकल्पीय अधिवेशनात एखाद्या आर्थिक विधेयकावर मतदान मागण्याची रणनीती विरोधकांकडून आखली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय ११ मार्चला उत्तर प्रदेशसह पाच राज्यांचे निकाल लागत असून हे निकाल भाजपच्या विरोधात गेल्यास त्याचा परिणामही राज्य सरकारच्या स्थैर्यावर होऊ शकतो, अशी माहिती काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली.

भाजपला पाठिंब्याचा प्रश्नच नाही : पवार
मुंबई महापालिकेत भाजपला पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही, असे शरद पवार यांनी नांदेड येथे बोलताना नमूद केले. ते म्हणाले, शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल असे वाटत नाही. उद्धव यांची पावले अजून त्या दिशेने नाहीत. त्यांनी पाठिंबा काढलाच तर निवडणूक होईल. कारण संख्याबळाअभावी आम्ही सरकार बनवू शकत नाही. त्यांचा पाठिंबाही घेऊ शकत नाही, पाठिंबा देऊ शकत नाही. त्यामुळे निवडणुकीशिवाय पर्याय नसल्याचे पवार म्हणाले.
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, विधानसभेतील पक्षीय बलाबल... 
बातम्या आणखी आहेत...