आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जाचा व महसूली तुटीचा विचार न केलेला दिशाहीन अर्थसंकल्प- विरोधक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यावर 3 लाख 33 हजार कोटींचे कर्ज आहे. वित्तीय तूट 30 हजारांच्या घरात आहे या परिस्थितीत आर्थिक शिस्त राखून अर्थसंकल्प सादर करणे आवश्यक होते. त्यामुळे हा अर्थसंकल्प दिशाहीन असल्याची टीका काँग्रेस-राष्ट्रवादीने केली आहे. शेतीसाठी भरीव तरतूद केल्याचे वरकरणी दिसत असले तरी जलयुक्त शिवार योजना ही धूळफेक करणारी आहे. मागेल त्याला शेततळे देणार म्हणता पण 50 हजारांत शेततळे होत नाही अशी टीका राष्ट्रवादीचे नेते व माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी केली आहे.
राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनीही अर्थसंकल्पाला कोणतेही दिशा नसल्याचे म्हटले आहे. शेती क्षेत्रासाठी 25 हजार कोटींची तरतूद केल्याचे हे सरकार सांगत आहे पण त्याचा उलगडा होत नाही. जलसिंचन सोडल्यास इतर कोणत्या घटकांसाठी किती रक्कम खर्च केली जाणार याचा ताळमेळ लागत नाही. अर्थमंत्र्यांच्या दीड-पावणेदोन तासांच्या भाषणातही त्याचे स्पष्टीकरण मिळाले नाही. त्यामुळे अर्थमंत्र्यांनी 25 हजार कोटींची घोषणा केली असली तरी शेवटी शेतक-यांची फसवणूकच होणार आहे अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते हरीश रोग्ये यांनी अर्थसंकल्पावर टीका करताना म्हटले की, सरकारने आर्थिक स्थित पाळायला हवी होती. केंद्र सरकारच्या योजनांचा फायदा घेण्यासाठी हे सरकार कमी पडत असून, केंद्राच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी काहीही उपाययोजना किंवा तरतूद केलेली दिसत नाही. केंद्राने सातवा वेतन आयोग लागू केला आहे. मात्र, राज्य सरकारने सातव्या वेतन आयोगासाठी काहीही तरतूद केली नाही. त्यामुळे पुढे राज्याच्या तिजोरीवर भार पडणार असल्याची टीका रोग्ये यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...