आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीरा-भाईंदरमध्ये पुन्हा छमछम? आर्केस्ट्रा बारचे परवाने रद्द करण्याच्या आदेशांना स्थगिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मीरा-भाईंदरमधील बारमालकांनी गृह विभागाकडे केलेल्या अपिलावर ठेवण्यात आलेल्या सुनावणीला महसूल विभागाचे अधिकारीच अनुपस्थित राहिल्याने परवाने रद्द करण्याच्या आदेशांना गृह विभागाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे मीरा-भाईंदरमधील ऑर्केस्ट्रा बारमध्ये पुन्हा छमछम सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
ऑर्केस्ट्रा बारमधून सुरू असलेल्या अनैतिक प्रकारांना आळा घालण्यासाठी ऑर्केस्ट्रा बारचे परवाने रद्द व्हावेत यासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांनी केलेले प्रयत्न व्यर्थ ठरले आहेत. यासंदर्भातले अंतिम आदेश होईपर्यंत ऑर्केस्ट्रा बार सुरू करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे आदेश शासनाने काढले आहेत. ऑर्केस्ट्रा बारमध्ये सुरू असलेल्या अनैतिक प्रकारांविरोधात ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी जोरदार आघाडी उघडली होती. ऑर्केस्ट्रा बारमध्ये असलेल्या बारबालांकडून बारमालक अश्लील कृत्ये करवून घेत असल्याने ऑर्केस्ट्रा बारचे परवाने रद्द करण्याची विनंती पोलिस अधीक्षकांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी 7 सप्टेंबरला ऑर्केस्ट्रा बारचे परवाने रद्द करण्यात येत असल्याचे आदेश जारी केले. या आदेशांनंतर मीरा-भाईंदरमधील सर्व ऑर्केस्ट्रा बार बंद झाले होते. त्याजागी बारमालकांनी केवळ बार सुरू ठेवले होते.
 
महसूल विभागाच्या या आदेशांविरोधात मे. हॉटेल स्पेस एंटरप्रायजेस रेस्टॉरंट अँड बार यांनी राज्य शासनाच्या गृह विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे अपील दाखल केले होते. या अपिलावर १६ ऑक्टोबर रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती, परंतु या सुनावणीला महसूल विभागाकडून तहसीलदार अथवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे मुख्य सचिवांनी ऑर्केस्ट्रा बारचे परवाने रद्द करण्याच्या आदेशांना पुढील सुनावणी होईपर्यंत स्थगिती दिली आहे. 

अपील केलेल्या हॉटेल स्पेस एंटरप्रायजेस यांना यासंदर्भातले अंतिम आदेश होईपर्यंत ऑर्केस्ट्रा बार सुरू करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे आदेश गृह विभागाने दिले आहेत. या आदेशांच्या पाश्र्वभूमीवर शहरातील इतर ऑर्केस्ट्रा बारदेखील पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...