आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारात वस्तू विकणाऱ्या महिलेचे अवयवदान; सहा रुग्णांना जीवदान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्याच्या कशेळे गावातील ताराबाई श्रावण पवार (४५) या एक सर्वसामान्य कुटुंबातील अशिक्षित महिला. जिवंत असेपर्यंत त्यांनी संसाराचा गाडा सुरळीत चालवण्यासाठी आठवडी बाजारात दुकान लावून वस्तू विकत पतीला मदत केली, परंतु 
मृत्यूनंतरही अवयवदान करून सहा जणांना त्यांनी जीवदान दिले. हृदय, लिव्हर, किडनी आणि दोघांना डोळे दान करत इतरांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण केला. जेजे रुग्णालयात झालेल्या अवयवदानानंतर कशेळे गावात बुधवारी ६ सप्टेंबरला ताराबाईंवर अंत्यसंस्कार करण्यात आले.   

बेलदार समाजाचे श्रावण पवार २५ वर्षांपासून कशेळे गावात राहतात. रस्त्यांसाठी दगड फोडण्याचे काम करणारा हा समाज. कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी आणि श्रावण यांना मदत म्हणून ताराबाई दर शुक्रवारी सुया, काजळ, फण्या, आरसे, बांगड्या विकायच्या. २६ ऑगस्टला छातीत दुखू लागल्याने ताराबाईंना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल केले. तेथे पाच दिवस उपचार घेतल्यानंतर २ सप्टेंबरला त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याने जेजे रुग्णालयात हलवण्यात आले. त्याआधी पती आणि भाऊ अंकुश मोहिते तसेच मुलगा गणेश यांच्या संमतीने अवयवदानाचा निर्णय झाला. ४ सप्टेंबरला त्यांचे निधन झाले. ५ सप्टेंबरला ब्रेन डेड झालेल्या ताराबाईंची अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर त्यांचे हृदय फोर्टिस रुग्णालयातील रुग्णास, लिव्हर नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात, एक किडनी ज्युपिटर रुग्णालयात, दुसरी किडनी तसेच दोन डोळे मुंबईतील जेजे रुग्णालयातील रुग्णास देण्यात आले.   

अवयवदानासाठी जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांच्या नेतृत्वाखाली टीमने मेहनत घेतली. यात अधीक्षक डॉ. संजय सुरासे, जनरल सर्जरी िवभागप्रमुख डॉ. अजय भंडारवार, डाॅ. अन्वय मुळे, डॉ भरत शहा, डॉ. व्यंकट गिते, डॉ. गीता सेठ, समाजसेवा अधीक्षक राठोड, सावरकर, पाटील, डॉ. नंदकर, डॉ. विद्या नागर, डॉ. मधुकर गायकवाड, डॉ. विकास मैंदाड, समाजसेवा अधीक्षक राठोड, सावरकर यांचा समावेश होता. वैद्यकीय शिक्षणमंत्री िगरीश महाजन यांनी पवार कुटुंबीयांचे अाभार मानले.
 
...तर हजारो  रुग्णांना फायदा  
ताराबाईंच्या अवयवदानामुळे सहा रुग्णांना आधार मिळाला. ब्रेन डेड रुग्णांच्या नातेवाइकांची समजूत घालण्यात वेळ जातो. वेळेत ही प्रक्रिया झाली तर हजारो रुग्णांना याचा फायदा होऊ शकतो.  
- डॉ. अजय भंडारवार  
बातम्या आणखी आहेत...