आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेंद्रिय शेतीला प्राेत्साहन; ४३२८ काेटी रुपयांचा निधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाची राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत कृषी विकास योजना राज्यात राबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला अाहे. या योजनेचा ६० टक्के आर्थिक भार केंद्र तर ४० टक्के आर्थिक भार राज्य शासन उचलणार आहे. या योजनेसाठी केंद्राच्या ३९९१.६० लाख आणि राज्य शासनाच्या २६६१.०६ लाख रुपये रकमेच्या कार्यक्रमास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. केंद्राकडून पहिल्या हप्त्यापोटी मिळालेले २५९८.५१ लाख व राज्याचे १७२९.६९ लाख रुपये अनुदान देण्यासही मान्यता देण्यात आली.
या योजनेअंतर्गत ५० एकर क्षेत्राचा व ५० शेतकऱ्यांचा गट असे ९३२ गट तयार करण्यात येणार आहेत. या गटांच्या माध्यमातून ४६,६०० एकर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली येणार आहे. एका शेतकऱ्याला कमाल अडीच एकरांपर्यंत लाभ देण्यात येईल. शेतकऱ्यांच्या गटामधून एकाची गट मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात येईल. तसेच एकात्मिक सेंद्रिय खत व्यवस्थापनासाठी ३ लाख २५ हजार, अवजारे भाड्याने घेण्यासाठी १५ हजार अनुदान देण्यात येणार आहे.
मागेल त्याला शेततळे : राज्यात मागेल त्याला शेततळे ही योजना अनुदान पद्धतीने राबवण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. टंचाईग्रस्त भागात शेततळी फायदेशीर ठरू शकत असल्याने शासन ही याेजना राबवणार अाहे. मागील पाच वर्षांत ज्या गावात किमान एक वर्ष तरी ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर झाली आहे, अशा गावांमध्ये प्राधान्याने पहिल्या टप्प्यात ५१,५०० शेततळी घेतली जाणार अाहेत. या योजनेअंतर्गत सात प्रकारच्या आकाराची शेततळी निश्चित करण्यात आली आहेत. सर्वात मोठे शेततळे ३० बाय ३० बाय ३ मीटर, तर सर्वात लहान शेततळ्यासाठी १५ बाय १५ बाय ३ मीटर या अाकाराचे असेल. सर्वात मोठ्या शेततळ्यासाठी ५० हजारांपर्यंत अनुदान देण्यात येईल.

शिर्डी विमानतळासाठी शंभर काेटींचा निधी
श्री साई शताब्दी वर्ष सुरू होण्यापूर्वीच शिर्डीला विमानतळ कार्यान्वित करण्यासाठी काकडी (ता. कोपरगाव) येथील विमानतळाच्या उर्वरित विकासकामांसाठी शंभर काेटी रुपये देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमार्फत हे काम केले जात अाहे.