आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Out Side Do Not Give Lesson To Us, Manikrao Thakare Remark On Modi Visit

बाहेरच्यांनी आम्हाला धडे देऊ नयेत, माणिकराव ठाकरे यांनी घेतला मोदींचा समाचार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘महाराष्‍ट्राचा शैक्षणिक इतिहास आणि वर्तमान संपूर्ण भारताला ज्ञात आहे. संपूर्ण देशाला इंजिनिअर्स आणि डॉक्टर्स देणारे राज्य म्हणून महाराष्‍ट्राची ओळख आहे. त्यामुळे बाहेरच्या लोकांनी आमच्याच राज्यात येऊन तेही राज्याची शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात येऊन आम्हाला शिक्षणाबाबतचे धडे देण्याची अजिबात गरज नाही,’ अशा शब्दांत कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा समाचार घेतला.


प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, काँग्रेसला धर्मनिरपेक्षतेचा मुखवटा किंवा बुरखा घालावा लागलेला नाही. कारण काँग्रेसचा मूळ चेहराच धर्मनिरपेक्षतेचा आहे. ज्यांना खरा चेहरा लपवायचा असतो त्यांनाच बुरखे-मुखवटे वापरावे लागतात. धर्मांधतेच्या ख-या चेह-यावर विकासाचा मुखवटा कोण घालतो, दंगलखोर चेहरा लपवण्यासाठी राष्‍ट्रवादाचा बुरखा कोण पांघरतो, ते देशाला चांगलेच ठाऊक आहे.


असाच राष्‍ट्रवादाचा बुरखा नथुराम गोडसेने घातला होता आणि त्यानेच राष्‍ट्रवादाचे सर्वात मोठे प्रतिक असलेल्या राष्‍ट्रपिता महात्मा गांधींची हत्या केली होती, ही वस्तुस्थिती देश अजून विसरलेला नाही, याकडेही माणिकरावांनी लक्ष वेधले.


अन्न सुरक्षेचा अध्यादेश म्हणजे केवळ कागदाचा एक तुकडा नव्हे, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. माहितीचा अधिकार व मनरेगा हे केवळ कायद्याचे कागद राहिलेले नाहीत. काँग्रेसच्या पुढाकाराने झालेल्या या दोन्ही कायद्यांचे फायदे सर्वांसमोर आहेत. तसेच अन्न सुरक्षा अध्यादेशाचे फायदेही या देशाला मिळतील. ज्यांना सामान्य जनतेचे भले बघायचेच नाही, त्यांना हे कायदे म्हणजे केवळ कागदच भासणार, यात नवल ते काहीच नाही.


मित्रपक्षांशी कसे वागावे, ते विरोधकांनी काँग्रेसला शिकवण्याची गरज नाही. ज्यांच्या नुसत्या येण्याने मित्रपक्ष पळून जातात, त्यांनी इतरांना आघाडीचा धर्म सांगावा, हाच मुळात एक मोठा विनोद आहे, असा टोलाही माणिकरावांनी मोदींना लगावला.


विरोधी पक्षांनी त्यांच्या सरकारांची तुलना काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारांशी अजिबात करू नये. तशी तुलना करण्याऐवजी केंद्रातील त्यांचे सरकार सहा वर्षांत आणि महाराष्‍ट्रातील सरकार अवघ्या साडेचार वर्षांत जनतेने हद्दपार का केले, याचे आत्मचिंतन केले तर अधिक बरे होईल, असा उपरोधिक सल्लाही माणिकरावांनी दिला.