आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Owaisi Expanding His Political Party In Maharashtra State

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निवडणूकांच्या पार्श्‍वभूमीवर ओवेसी करणार महाराष्‍ट्रात आपल्या पक्षाचा विस्तार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘ऑल इंडिया मजलीस-ई-ईत्तेहादुल मुस्लिमीन’चे (एमआयएम) प्रमुख खासदार असदुद्दीन ओवोसी यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्‍ट्रात आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचे मनसुबे आखले आहेत. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील मुस्लिमांची संख्या लक्षात घेऊन सर्वप्रथम या विभागात पक्षाचे काम सुरु करण्यात येणार असून ईदनंतर या तीनही शहरात पक्ष कार्यालये सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर औरंगाबाद येथेही पक्ष मजबूत करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.


नांदेड महापालिका निवडणुकीत ओवेसींच्या पक्षाने चांगलेच यश प्राप्त करीत 11 जागा जिंकल्या. नांदेडमध्ये मिळालेल्या या अनपेक्षित यशाने प्रेरित होऊन ओवेसींनी राज्यभरात पक्ष वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मुस्लिम बहुल विभागांमध्ये निवडणुका लढवण्याचा विचार ओवेसी यांनी केला असून काही ठिकाणी नांदेडप्रमाणे अन्य पक्षांशी युतीही केली जाणार आहे.


कॉँग्रेसला फटका
ओवेसी महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय झाले तर त्याचा बराच मोठा फटका काँग्रेसला बसेल,असे अंदाज राजकीय वर्तुळात काढले जात आहेत. मुस्लिम समाज ही काँग्रेसची व्होटबॅँक मानली जाते. काही ठिकाणी समाजवादी पार्टीने मुस्लिम मतदारांना आकर्षित केल्याने त्याचाही फटका काँग्रेसला बसलाच आहे. त्यातच आता ओवेसींच्या पक्षानेही मुस्लिम मतदारांना आकर्षित केले तर काँग्रेसला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नुकसान होण्याची
शक्यता वर्तवली जात आहे.


एक खासदार, सात आमदार
1956 मध्ये हैदराबादमध्ये ‘एमआयएम’ पक्षाची स्थापना करण्यात आली होती. हैदराबाद आणि आंध्र प्रदेशमध्ये पक्षाची चांगली ताकद असून ओवेसी स्वत: खासदार आहेत तर त्यांचा भाऊ अकबरुद्दीन ओवेसी यांच्यासह सात आमदार आहेत. खरे तर महाराष्ट्रात ‘एमआयएम’वर बंदी घातली असल्याचे वक्तव्य गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी विधानसभेत केले होते. तरीही ‘एमआयएम’ने नांदेडमध्ये प्रचंड यश मिळवले होते.


शिवसेनेचा राजकीय शत्रू
मुंबईतील वांद्रे, महंमद अली रोड, अंबरनाथ, वाशी येथे ईदनंतर ‘एमआयएम’ची कार्यालये सुरु करण्यात येणार असून त्यानंतर विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राकडे ओवेसी आपले लक्ष वळवणार असल्याचेही पक्षातील सूत्रांनी सांगितले. खासदार असदुद्दीन ओवेसींचा ‘एमआयएम’ पक्ष राज्याच्या राजकारणात सक्रिय झाल्यास शिवसेनेला आणखी एक राजकीय शत्रू मिळेल आणि हिंदू मतांचे राजकारण आणखी पुढे नेता येईल असे बोलले जात आहे.