आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • P.K.Jain News In Marathi,Ramdas Athawale, RPI, BJP, Divya Marathi

भाजपने नाकारलेले आयपीएस जैन ‘रिपाइं’त, आठवलेंकडून स्वागत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पोलिस दलातील सेवेचा राजीनामा देऊन बाहेर पडलेले, पण भाजपने लोकसभेचे तिकीट नाकारलेले राज्याचे माजी अतिरिक्त पोलिस महासंचालक पी. के. जैन यांनी मंगळवारी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. खासदार रामदास आठवले यांनी त्यांचे स्वागत करून प्रवेश करताक्षणी जैन यांना पक्षाचे उपाध्यक्षपदही बहाल केले.


मुंबईचे पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर काही दिवसांतच प्रेम कृष्ण जैन यांनीही पदाचा राजीनामा दिला. जैन भाजपमध्ये प्रवेशासाठी इच्छुक होते; परंतु मंगळवारी त्यांचा ‘रिपाइं’मध्ये प्रवेश झाला. जैन मूळचे पंजाबचे. 1981 बॅचचे आयपीएस असलेल्या जैन यांना महाराष्‍ट्र केडर मिळाले. यवतमाळ आणि औरंगाबाद येथे ते पोलिस अधीक्षक होते. नागपूर आणि मुंबईत त्यांनी पोलिस उपायुक्त म्हणून काम केले आहे. नक्षलवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. तसेच राज्य राखीव पोलिस दलाचे समादेशक म्हणून धुळे आणि पुणे येथे त्यांनी काम केले आहे. फेब्रुवारीमध्ये जैन निवृत्त होणार होते. मात्र, निवृत्तीला काही दिवस बाकी असताना त्यांनी पोलिस सेवेचा राजीनामा दिला. त्या वेळी ते राज्याचे अतिरक्त पोलिस महासंचालक या पदावर ते कार्यरत होते. त्यांनी 33 वर्षे पोलिस विभागात सेवा बजावली आहे. महाराष्‍ट्र राज्य आयपीएस असोसिएशनचे काही काळ ते सचिव होते. पोलिस दलातील बढत्यांबाबत त्यांनी अनेकदा नाराजी प्रकट केली होती.


मराठवाड्याचे विद्यार्थी
पी. के. जैन औरंगाबादमध्ये पोलिस अधीक्षक होते. त्या काळात आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पत्रकारितेच्या पदव्युत्तर पदवीमध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळवले आहे. राजीनाम्यानंतर त्यांनी पंजाबातील संगरूर लोकसभा मतदारसंघातून तिकीट मागितले होते. त्यांना भाजपने तिकीट नाकारले. त्यामुळे जैन यांनी ‘रिपाइं’ची पायरी चढणे पसंत केल्याचे सांगितले जाते.