आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहान मुलांची चित्रे होर्डिंग्जवर झळकणार, मुंबई महानगरपालिकेचा कौतुकास्पद निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शाळकरी विद्यार्थ्यांनी रेखाटलेली स्वप्ननगरीची चित्रे आता मुंबई शहरातील मोक्याच्या जागी असलेल्या होर्डिंग्जवर झळकवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. रविवारी मुंबईत दिवंगत व्यंगचित्रकार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सवानिमित्त बालचित्रकला पार पडली. त्यामध्ये तब्बल ५६ हजार विद्यार्थ्यांनी हाती कुंचला घेत भविष्यातील मुंबापुरीच्या संकल्पना चित्रबद्ध केल्या.

बाळासाहेबांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधत मुंबईच्या महापौरांकडून दरवर्षी बालचित्रकला स्पर्धा घेण्यात येते. रविवारी झालेल्या स्पर्धेत मुंबईतील ५६ हजार ३८८ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. शहरातील ३९ उद्यानात ही स्पर्धा पार पडली. चिमुकल्यांच्या उपस्थितीने मुंबईची उद्याने रविवार असूनही सकाळीच फुलून गेली होती.

पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी आणि नववी ते दहावी अशा तीन गटांत ही बालचित्रकला स्पर्धा झाली. तर स्पर्धेचे विषय होते, माझी मुंबई-स्वच्छ मुंबई, माझ्या मुंबईतील मौज स्थळे, पाण्याचे नियोजन करूया- मुंबई घडवू या, माझ्या मुंबईतील उत्सव आदी. यातील ३९ विजेते निवडण्यात येणार असून त्यांना पाच लाखांपेक्षा अधिक बक्षिसे दिली जाणार आहेत. विशेष म्हणजे या बालकांनी भविष्यातील आदर्श मुंबई विषयी रेखाटलेल्या संकल्पानांचा वापर शहराचे नियोजन करताना विचारात घेतला जाणार आहे. तसेच विजेत्या बालचित्रकारांची लक्षवेधी आणि ज्यामधून महत्त्वाचा सामाजिक संदेश प्रकट होत असेल, अशी चित्रे मुंबईतल्या मोक्याच्या जागी असणाऱ्या होर्डिंग्जवर झळकवण्यात येणार आहेत.

कल्पना जाणून घेण्यासाठी स्पर्धा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्रकार म्हणून जगभरात ख्याती होती. व्यंगचित्रातून अचूक भाष्य करण्याची त्यांची हातोटी वाखाणली गेली. त्यांच्या कलेपासून भावी पिढीने प्रेरणा घ्यावी. तसेच मुंबईविषयीच्या जाणिवा विद्यार्थ्यांमध्ये वाढाव्यात, भावी पिढीच्या आपल्या शहराविषयी काय कल्पना आहेत, हे ओळखण्यासाठी ही चित्रकला स्पर्धा दिशादर्शक माध्यम ठरते आहे, असे मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना सांगितले.