आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालघरजवळ भीषण अपघात, गर्भवती तरूणीसह चार महिला ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पालघर- मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघरजवळ पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. पालघरनजीक गुंदावे गावात मॅजिक गाडीने उभ्या असलेल्या ट्रकला समोरून धडक दिल्याने एका गर्भवती तरूणीसह 4 महिलांचा मृत्यू झाला आहे. मृत महिला पालघरजवळीलच नावझे गावातील असून, त्या एकमेकींच्या नातेवाईक आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्भपती महिलेच्या पोटात कळा येऊ लागल्याने मध्यरात्री तीन-साडेतीनच्या सुमारास मॅजिक गाडीने हे लोक रूग्णालयात जात होते. मात्र, गुंदावे येथे रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक मॅजिक चालवणा-या चालकाला दिसला नाही. गर्भवती महिलेच्या पोटात जोरदार कळा येत असल्याने चालकाचे लक्ष मागे बसलेल्या महिलांकडे जात होते. तसेच या महिला बोलत असल्याने चालकाने लक्ष विचलित झाले.
वरई-सफाले रस्त्यावर गाडीला वेग असल्याने व लक्ष विचलित झाल्याने मॅजिक गाडी थेट ट्रकवर जाऊन जोरात धडकली. यात गर्भवती महिलेंसह इतर महिलाही गंभीर जखमी झाल्या. दोघींचा जागीच मृत्यू झाला तर दोघींचा रूग्णालयात मृत्यू झाला. सुदैवाने चालक बचावला आहे. मृतांची नावे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.
मागील काही दिवसापासून मुंबई-अहमदबाद महामार्गावर पालघर व डहाणू परिसरात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मागील आठवड्यात झालेल्या एका अपघातात एकाच कुटुंबातील 11 जणांचा मृत्यू झाला होता.