आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Palghar Assembly Byelection Result Live, Shivsena\'s Amit Ghoda Takes Marginally Leads

पालघर पोटनिवडणूक: सेनेचे अमित घोडा विजयी, राजेंद्र गावित 19 हजारांनी पराभूत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमित घोडा (फाईल फोटो) - Divya Marathi
अमित घोडा (फाईल फोटो)
मुंबई- पालघर पोटनिवडणुकीचा निकाल हाती आला असून, शिवसेनेचे उमेदवार अमित घोडा यांनी अपेक्षेप्रमाणे विजय खेचून आणला आहे. अमित घोडा यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र गावित यांचा 18 हजार 948 हजार मतांनी पराभव केला आहे. बहुजन विकास आघाडीच्या उमेदवार मनिषा निमकर तिस-या स्थानावर फेकल्या गेल्या. घोडा यांना एकून 67 हजार 129 मते मिळाली तर गावित यांना 48148 मते तर निमकर यांना 36781 मते मिळाली.
पालघर येथील सेंट जॉन महाविद्यालयात आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरु झाली. मात्र, शिवसेनेचे उमेदवार अमित घोडा यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेण्यास सुरुवात केली. काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र गावित दुस-या स्थानावर होते. 9 व्या फेरीअखेर घोडा 28 हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर होते. मात्र, नंतरच्या फेरीत गावित यांनी पिछाडी भरून काढली. मात्र, राजेंद्र गावित यांना अपेक्षेपेक्षा खूपच कमी मते मिळाली.
शिवसेनेचे आमदार कृष्णा घोडा यांच्या निधनाने रिक्त असलेल्या पालघर (राखीव) मतदारसंघात 13 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. शिवसेनेने घोडा यांचे चिरंजीव अमित घोडा यांना उमेदवारी दिली होती. तर काँग्रेस–राष्ट्रवादीने राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली. बहुजन विकास आघाडीच्या मनिषा निमकर या सुद्धा निवडणूक रिंगणात होत्या. त्यामुळे निवडणुकीत तिरंगी लढत पहायला मिळाली. मात्र, आज मतमोजणीच्या दिवशी पहिल्या फेरीपासूनच घोडा यांनी आघाडी घेत विजयाकडे वाटचाल सुरु केली होती.
या पोटनिवडणुकीचे वैशिष्ट्ये-
- या पोटनिवडणुकीत प्रथमच मतपत्रिकेवर उमेदवारांचे छायाचित्र लावले गेले.
- 312 मतदान केंद्रावर शनिवारी मतदान पार पडले.
- 2,47,596 एकून मतदार, त्यात 1, 27, 282 पुरुष तर 1, 20, 302 महिला मतदार आहेत.
- यातील 1 लाख 61 हजार 535 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
- 13 फेब्रुवारीला झालेल्या पालघर विधानसभा मतदारसंघात 65 टक्के मतदान झाले होते.
- पालघर येथील सेंट जॉन महाविद्यालयात आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरु झाली. दुपारी 12 पूर्वीच निकाल हाती आला.
- शिवसेनेचे आमदार कृष्णा घोडा यांच्या आकस्मिक निधनानंतर तेथे पोटनिवडणूक झाली आहे. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार अमित घोडा यांच्या बाजूने सहानुभूती पाहायला मिळली. त्यामुळेच घोडा यांनी 18 हजारांहून अधिक मतांनी विजय खेचून आणला.