आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pallavi Joshi Quits FTII Society Over Gajendra Chauhan\'s Appointment As The Chairman

अभिनेत्री पल्लवी जोशीचा FTII च्या संचालकपदाचा राजीनामा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- मराठी अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी FTII च्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. FTII मधील विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय, सरकार कोणतेही नरमाईची भूमिका घेत नाही, अशा स्थितीत तेथे काम करण्यात मला रस नाही असे पल्लवी जोशी यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री अरूण जेटली यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, पल्लवी जोशींच्या राजीनाम्याने FTII मधील विद्यार्थ्यांचे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. याआधी अनेक चित्रपट क्षेत्रातील मंडळींनी विद्यार्थ्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. तर, FTII च्या संचालकपदावरून फिल्ममेकर झानु बरुआ आणि सिनेमेटोग्राफर संतोष सिवान यांनी राजीनामा दिला होता. आता अभिनेत्री पल्लवी जोशी यांनीही संचालक मंडळावरुन राजीनामा देऊन गजेंद्र चौहानाच्या निवडीविरोधातील धग कायम ठेवली आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला लिहलेल्या पत्रात पल्लवी जोशी यांनी म्हटले आहे की, कुठल्याही मागणीसाठी संप करण्याला माझे अजिबात समर्थन नाही. मात्र ज्यांना तुम्ही शिकवता, ज्ञान देता त्यांना काय हवे हे विचारायला हवे. FTII मधील मुलांच्या मागण्या रास्त आहेत. अभिनेते गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीचाच केवळ मुद्दा नाही. तर त्यांच्या इतरही काही महत्त्वाच्या मागण्या आहेत. ज्यांच्याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज होती. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन सरकारने नरमाई दाखवायला हवी होती. तसे झाले असते तर विद्यार्थ्यांनीही सामजस्याची नक्कीच भूमिका घेतली असती. पण तसे झाले नाही. सरकारने गजेंद्र चौहानांच्या नियुक्तीचा वाद प्रतिष्ठेचा केला आहे. त्यामुळेच ते त्यांच्या म्हणण्यावर ठाम आहे. ज्या मुलांसाठी आम्ही या फिल्म इन्स्टिट्यूटमधे काम करतो आहे, त्या मुलांवर असा अन्याय होतोय, त्यांच्या विचारांना स्थान नसेल तर येथे आम्ही कसे काम करू शकतो. कारण ही मुलेच आपले भविष्य आहे. सरकार त्यांचे म्हणणे ऐकून घेत नसेल तर चित्रपट क्षेत्रातील आमच्यासारख्या मंडळींनी या मुलांच्या सोबत रहायलाच हवे. सरकार या मुलांवर दहा-दहा लाख खर्च करते मग त्यांचे म्हणणे का ऐकत नाही हा प्रश्न मला सतावतो आहे. याद्वारे सरकार विद्यार्थ्यांचे पंख छाटत आहे. वैचारिक व व्यक्तीस्वातंत्र्यांचीही गळचेपी होत असेल तर त्यांची स्वप्ने पूर्ण कशी होतील असा सवाल पल्लवी जोशी यांनी या पत्रात विचारला आहे.
दरम्यान, FTII मधील विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरुच असून, केंद्र सरकार याप्रकरणी तसूभरही मागे सरकण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. FTIIच्या प्रमुखपदी गजेंद्र चौहानच राहतील असे अरूण जेटलींनी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठकीत सुनावले आहे. याच घटनेनंतर पल्लवी जोशींनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे कळते आहे.