आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंत्रिपद द्या, नाहीतर राजकीय संन्यास, फुंडकरांच्या इशाऱ्याने मुख्यमंत्री पेचात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारापाठोपाठ राज्य मंत्रिमंडळातही अाठ जुलैपर्यंत विस्तार हाेण्याची शक्यता अाहे. भाजपचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब फुंडकर हे मंत्रिमंडळ समावेशासाठी आग्रही असून आपला समावेश न झाल्यास राजकीय संन्यास घोषित करू, असा इशाराच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचे विश्वसनीय वृत्त अाहे. त्यामुळे मुख्यमंत्री पेचात पडले आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी फडणवीसांनी चर्चाही केली. मात्र, फुंडकरांबद्दलचा निर्णय अद्याप तरी गुलदस्त्यात आहे.
१८ जुलैपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तारासाठी नावे अंतिम केली जात असताना फुंडकर यांच्या धमकीने मुख्यमंत्री पेचात पडले आहेत. मंत्रिमंडळात समावेश न झाल्यास एक भव्य जाहीर सभा घेऊन अामदारकी व भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा आणि राजकीय संन्यास घोषित करण्याचा इशारा फुंडकरांनी महिनाभरापूर्वी दिला.

खडसे यांचा राजीनामा हा भाजपमधील बहुजन नेतृत्वाविरुद्ध कट असल्याचा विखारी प्रचार खडसे समर्थकांनी चालवला आहे. या पार्श्वभूमीवर फुंडकरांनी खरोखरच पक्षाला रामराम ठाेकला तर या विखारी प्रचाराला अधिकच बळ मिळेल, अशी भीती फडणवीस यांना वाटतेय. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या सात-अाठ महिन्यांत होणार आहेत. अशा वेळेेस फुंडकरांसारख्या ज्येष्ठ नेत्याचा संन्यास भाजपला भारी पडू शकतो.

राजकीय पेचाचे अन्य कंगोरे
पश्चिम विदर्भ पट्ट्यात भाजपने डॉ. रणजित पाटील आणि प्रवीण पोटे या या दाेघांनाच मंत्रिपदे दिली अाहेत. हे दाेघेही विधान परिषदेचे सदस्य आहेत. उलट विधानसभेवर अनेकदा निवडून आलेले चैनसुख संचेती, डॉ. संजय कुटे, गोवर्धन शर्मा यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना डावलण्यात अाले. पक्षात कनिष्ठ असलेल्या नेत्यांना महत्त्वाची मंत्रिपदे मिळाल्याने पूर्व विदर्भातील मुख्यमंत्र्यांना या भागातील मजबूत नेतृत्व नको आहे, अशी चर्चा पश्चिम विदर्भात रंगली आहे. मात्र, याच पट्ट्यात भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष, आणि विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते फुंडकर यांना पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिपद मिळणे अपेक्षित हाेते. अाता फुंडकरांना मंत्री केले तर बुलडाणा जिल्ह्यातीलच डॉ. कुटे यांना मंत्रिपद मिळणे कठीण दिसते. कुटे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांना टाळायचे कसे, असा पक्षासमाेर प्रश्न अाहे. रशिया दौऱ्यापूर्वी विस्तार : मुख्यमंत्री १० जुलैपासून रशियाच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यापूर्वी हा विस्तार केला जाईल. ८ जुलैस विधान परिषदेचे विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले असून त्यात सभापतींची निवड करण्यात येणार आहे. याच दिवशी विस्तार केला जाण्याची शक्यता आहे.

पक्ष साेडणार नाही
^मंत्रिपदासाठी आपण कोणताही इशारा भाजप किंवा मुख्यमंत्र्यांना दिलेला नाही. आजवर आयुष्य ज्या पक्षात काढले तो पक्ष आता आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात कशाला सोडणार? मला मंत्री केले नाही तरी मी भाजपतच राहील.
भाऊसाहेब फुंडकर, ज्येष्ठ नेते, भाजप
बातम्या आणखी आहेत...