आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pankaja And Dhananjay Munde In Legislative Assembly

भाऊबंदकी : बहीण-भाऊ आमने-सामने; नजरानजर करणे मात्र टाळले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - परळीच्या शिशुगृहाच्या दत्तकप्रकरणी सोमवारी तारांकित प्रश्नाच्या निमित्ताने विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे हे भाऊ-बहीण विधान परिषदेत प्रथमच आमने-सामने आले खरे; परंतु दोघांनीही एकमेकांकडे पाहता उपसभापतींकडे पाहून प्रश्न विचारत आणि उत्तरे देत संघर्ष टाळला.

दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या राज्याच्या महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे त्यांचे बंधू तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यातील ‘राजकीय वैर’ जगजाहीर आहे. धनंजय हे विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेही आहेत. पंकजा मुंडे या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या सभागृहात केवळ दोन-चार वेळाच उपस्थित राहिल्या आहेत. मागच्या आठवड्यात महिला बालकल्याण खात्यासंदर्भात आलेल्या तारांकित प्रश्नाची उत्तरे राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी दिली.

सोमवारच्या प्रश्नोत्तराचा दिवस पंकजा मुंडे यांच्या खात्याचा होता. ग्रामविकास खात्याचे आज बहुतेक तारांकित प्रश्न होते. त्यामुळे पंकजा आणि ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर परिषदेत हजर होते. ग्रामविकास खात्याचे जे तारांकित प्रश्न होते त्याला आजही राज्यमंत्री केसरकर यांनीच उत्तरे दिली. अनेक ठिकाणी केसरकर अडले. विरोधकांनी त्यांना अडवले, पण केसरकर यांनी संयम ठेवत खिंड लढवली. विरोधी पक्षनेते म्हणून धनंजय मुंडे अत्यंत आक्रमक असतात. आजही ग्रामविकास खात्याच्या प्रश्नात त्यांनी असाच आक्रमकपणा दाखवला. मात्र, त्यांच्या प्रश्नांना केसरकर संयत शैलीत उत्तर देत होते.

जेव्हा एखाद्या प्रश्नावर विरोधक आक्रमक होतात त्या वेळी साहजिकच कॅबिनेट मंत्री पुढे येत बाजू सावरत असतो. ग्रामविकास खात्याच्या संदर्भात केसरकर अनेकदा अडले. मात्र, त्या वेळी कॅबिनेट मंत्री म्हणून पंकजा उत्तरे देण्यासाठी उठायच्या आणि लगेचच खाली बसायच्याही.

... अन‌् संकटातून सुटका
धनंजयमुंडे यांनी जेवढ्या आक्रमक भाषेत प्रश्न विचारले िततक्याच ठामपणे पंकजा यांनी ठोस उत्तरे िदली. मात्र, भावा-बहिणीमध्ये शाब्दिक चकमक झडली नाही. परळी वैजनाथ (जि. बीड) येथील नेमीचंद बडेरा शिशुगृहातून सहा बालके गायब झाल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. यासंबंधीचा अहवाल प्राप्त होताच संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश मुंदडा सचिव वीरेंद्र धोका यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पंकजा मुंडे यांनी दिले. त्यानंतर प्रश्नोत्तराचा तास संपताच एका संकटातून सुटका झाल्याचे भाव पंकजा यांच्या चेहर्‍यावर दिसले.

आक्रमक प्रश्न, ठोस उत्तरे
शेवटचा तारांकित प्रश्न परळीतील शिशुगृहासंदर्भात होता. विशेष म्हणजे तो प्रश्न धनंजय मुंडे यांचा होता. त्यामुळे ते कमालीचे आक्रमक होते. या प्रश्नावर पंकजा यांना उत्तर देण्याशिवाय पर्याय नव्हता. या प्रश्नावर पंकजांनी उत्तरे दिली, पण त्यांनी धनंजय मुंडे यांच्याकडे एकदाही पाहिले नाही. धनंजय मुंडे यांनी या प्रश्नात चार प्रतिप्रश्न केले, परंतु त्यांनीही पंकजाकडे पाहिले नाही. त्यांनी आपले सर्व प्रश्न उपसभापती वसंत डावखरे यांच्याकडे पाहूनच विचारले आणि पंकजा मुंडे यांनीसुद्धा आपली ठोस उत्तरे उपसभापती यांच्याकडे पाहूनच दिली.