आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचे बुरे दिन : पंकजा मुंडेंच्या खात्यात २०६ कोटींचा घोटाळा?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘ना खाएंगे, ना खाने देंगे’ अशी आश्वासने आणि भ्रष्टाचारमुक्त सरकारची द्वाही देत राज्यात सत्तेत आलेले देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप सरकार अवघ्या आठ महिन्यांच्या आतच मोठ्या घोटाळ्याच्या आरोपात अडकले आहे. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या खात्याने एकाच दिवशी २०६ कोटी रुपयांची चिक्की, डिशेस, चटया आणि वह्या- पुस्तके खरेदी करून मोठा घोटाळा केल्याचा आरोप आहे. त्यासाठी एकाच दिवसात तब्बल २४ अध्यादेश काढल्याचे प्रकरण समोर आल्यामुळे पंकजा वादाच्या भोवर्‍यात सापडल्या आहेत. या बाबात काँग्रेसने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) लेखी तक्रार केली असून या घोटाळ्याची एसीबी किंवा सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

एकात्मिक बालविकास कार्यक्रमांतर्गत पंकजा मुंडे यांच्या महिला व बालविकास खात्याने सर्व नियम आणि निकष धाब्यावर बसवून एकाच दिवसात २०६ कोटी रुपयांची खरेदी केल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. या खरेदीसाठी त्यांनी दिवसभरात २४ अध्यादेश काढल्याची नोंदच सरकार दफ्तरी आहे. या घोटाळ्याची लेखी तक्रार काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली आहे. सध्या विदेशात असलेल्या मुंडे यांनी मात्र काँग्रेसचे आरोप फेटाळले असून सर्व खरेदी नियमानुसार व मान्यताप्राप्त संस्थांकडून झाली असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

तीन लाखांच्यावर होणारी खरेदी ई-निविदांमार्फत व्हावी, असा आदेश डिसंेबर २०१४ मध्येच राज्य सरकारने दिला असताना मुंडे यांच्या विभागाने कोणतीही निविदा न काढता तब्बल २०६ कोटींची खरेदी केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. या आरोपांशी संबंधित कागदपत्रेही त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले आहेत.

पंकजा मुंडे यांच्या वरील या घोटाळ्याच्या आरोपामुळे भाजपप्रणित युती सरकारला मोठा धक्का बसला आहे. विनोद तावडे यांची पदवी बोगस असल्याचे प्रकरण अजून शांत झाले नसताना भाजपच्या पहिल्या फळीतील मंत्र्यांवर झालेला हा दुसरा मोठा आरोप आहे. विशेष म्हणजे विरोधक सक्रिय झाल्याचे हे संकेत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते.

भ्रष्टाचार टाळण्यासाठी गतीशील निर्णय : पंकजा
दरम्यान, या घोटाळ्यावरून राज्याचे राजकारण ढवळून निघाले असतानाच पंकजा मुंडे यांनी इ-मेलद्वारे खुलासा केला आहे. मी कोणतेही नियम धाब्यावर बसवले नाहीत. अधिकृत दर उपलब्ध असल्याने ई-निविदा काढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सर्व कंत्राटे मान्यता प्राप्त संस्थांनाच देण्यात आली आहेत. भ्रष्टाचार टाळण्यासाठी मी गतीशील निर्णय घेतले आहेत. गेली दोन वर्षे माझे कुटुंब प्रचंड तणावातून (वडिल गोपीनाथ मुंडेंच्या निधनामुळे) जात आहे. मुलाची प्रकृती ठिक नसल्यामुळे मी ‘मायेची सावली’देण्यासाठी थोडी सुटी घेतली आहे, असे त्यात म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण, पंतप्रधानांनी उत्तर द्यावे : चव्हाण
हा अतिशय मोठा व गंभीर घोटाळा असून कुणी तरी त्याबाबत स्पष्टीकरण दिलेच पाहिजे. एकूणच व्यवहार संशयास्पद असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण आणि पंतप्रधानांनी उत्तर द्यायला हवे. पंकजा मुंडे असोत की विनोद तावडे, सर्व आरोप निर्लज्जपणे फेटाळणे मोदी सरकारचे धोरणच असल्यामुळे ते कोणाचीही हकालपट्टी करणार नाहीत.- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री

पुरावे द्या, तरच गांभीर्याने घेऊ
विरोधक आरोप करत असले तरी ते जोपर्यंत पुरावे देणार नाहीत, तोपर्यंत आम्ही ते गांभीर्याने घेणार नाही. - एकनाथ खडसे, महसूल मंत्री

सव्वा कोटी जनतेला प्रामाणिकपणा दाखवा
‘ना खाएंगे, ना खाने देंगे’ असे आश्वासन दिल्याप्रमाणे भाजप आणि त्यांच्या सरकारांनी या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करावी आणि ते जसे बोलतात, तसेच वागतात, हे देशातील १.२५ कोटुुी जनतेपुढे सिद्ध करून दाखवावे. - रणदीप सुरजेवाला, काँग्रेसच्या माध्यम विभागाचे प्रमुख

न्यायालयीन चौकशी व्हावी
हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणी न्यायालयीन चौकशी करावी. या प्रकरणात आणखी कोणी मंत्री आहे का? याचाही तपास व्हायला हवा, - अजय माकन, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते.

पंकजांचा राजीनामा हवा
आम्ही सर्व पुरावे एसीबीकडे दिले आहेत. या प्रकरणाचा आम्ही पाठपुरावा करणार असून पंकजा मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा. - सचिन सावंत, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ता

पंकजा परदेशात, २८ जूनला परतणार :
मुलाच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे पंकजा मुंडे सध्या परदेशात असून त्या २८ जून रोजी मायदेशी परतण्याची शक्यता असल्याचे त्यांच्या मंत्रालयातील एका अधिकार्‍याने म्हटले आहे.

पुढे वाचा,
आरोपांवर पंकजा मुंडे यांचा खुलासा...
स्मृती इराणी : बनावट पदवीप्रकरणी चालणार खटला
वसंुधराराजे : ललित मोदींना मदत केल्याचे ठोस पुरावे