आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रूपयाचाही भ्रष्‍टाचार केला असेल तर मंत्रालयच काय राजकारणही सोडेन- पंकजा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मी सामान्य माणसांसाठी राजकारणात आले आहे. माझ्यावरच्या आरोपांचे मी खंडन करते व व्यथित मनाने त्याचा निषेध करते. मी सर्व प्रकारे निष्कलंक आहे. माझ्या नेत्यांचे मी आभार मानते, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. जर मी एक रूपयाची तरी मिंदी असेल तर मंत्रालयच काय तर राजकारणही सोडेन, अशी भावनिक साद महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी पुन्हा आपल्या ब्लॉगवर घातली आहे.
वाचा, पंकजा मुंडेंनी टि्वटवर पोस्ट केलेला मजकूर जसाच्या तसा...
कालपर्यंत माझं नांव गुगल केलं तर ' मी रडणार नाही, लढणार आहे ' असं सांगणारी बातमी यायची.आता देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील एक पहिला स्कॅम म्हणून बातमी येते. अर्थात मी अजूनही रडणार नाही, लढणारच आहे पण कोणासाठी ? ज्या जनतेसाठी मी लढणार आहे, ती जनता यात काय करू शकते? हा माझा सवाल आहे.जे माझ्यावर प्रेम करतात ते व्यथित होऊन बघतील व ज्यांना मला पराभूत करता आलं नाही ते मला परेशान केलं म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेतील आणि स्वतःला मर्द म्हणूनही घेतील.
राजकारण हे विना आरोपाचं होत नाही हे मला मान्य आहे, पण आरोपांचच राजकारण होत का फक्त? मग ज्याला राजकारणात लोकांसाठी काहीतरी करायचयं, त्यांनी काय कराव? कसं चालावं?

माझ्या मुलाला बरं नाही. माझं कुटूंब बाबांच्या जाण्याने दुःखी आहे. मी चार दिवस डाॅक्टरांच्या सल्ल्याने बाहेर आले तर एवढा गदारोळ कशाला? कोणासाठी? राजकारणातील एक उगवता मिनमिनता तारा प्रखर प्रकाशित होऊ नये यासाठी का मी त्या लाल दिव्याच्या गाडीत फिरते व सरकारी बंगल्यात रहाते? हे सहन होत नाही म्हणून. मला निव्वळ अपमानित करणं व राजकारणातून निष्कासित करणं, ज्यांना जीवनातील आपलं ध्येय वाटत, त्यांच्यासाठी? त्यांच्या हट्टासाठी? पण हे पद साधन आहे, साध्य नाही. मी, पिडीत,वंचित,मागासवर्गीय महिलांच प्रतिनिधीत्व करते,अंत्योदय हे खरचं मी अंमलात आणते. म्हणावं एखाद्यानं सत्तेत आल्यावर स्वतःसाठी कांही बदल केले किंवा सत्ता वापरली. दुर्दैव ! ' खरेदी ' या शब्दाऐवजी ' घोटाळा ' शब्द वापरावा आणि संपवावं सर्व. एक राजकीय जीवन....कलंकित करणं सोपयं इतक...

पक्षाबाहेर व पक्षातील समकालीनांना कधीही अशा पातळीच राजकारण कराव आणि जीवनातून हरवावं हे मी शिकले नाही व ते माझ्या रक्तातही नाही. मुंडे साहेब हयात असताना त्यांना पराभूत न करू शकणा-यांचा व ते असल्यामुळे आपण पुढे जाऊ शकत नाही याचा सुड माझ्याकडून घेणा-यांना माझ्याशी लढता आले नाही पण माझा मानसिक छळ करण्यात ते यशस्वी झाले. कांहीही चूक न करता नाहक मानहानी...रेस मध्ये सर्वात पुढे पळणा-या घोड्याची स्पीड कमी नाही करता आली तर त्याच्या पायावर गोळी घालण्यासारखा हा क्रुर प्रकार आहे. मी गेले चोवीस तास जेवले नाही, झोपले तर मी गेल्या वर्षभरात नाही ! पण मी विचार रात्रभर केला, गुगलवरच हे हेडिंग बदलेल कसं? मी गोपीनाथ मुंडे हे नांव जगाला विसरू देणार नाही ही शपथ घेतली ती गोचीडासारखी खुर्चीला चिटकून बसण्यासाठी नाही. मला लोकांच्या डोळ्यातील प्रश्न दिसतात. ताई तुमचा आम्हाला आधार आम्ही काय करणार ...कांही लोक माझ्या बदनामीने आनंदित असतील..काहीही म्हणतील...छापतील, ताई तुम्ही गुत्तेदारांना थारा देणार नाहीत. ताई तुम्ही बदल्यांसाठी आग्रह धरणार नाहीत,म्हणाला होतात ! हो..मी म्हणाले, व मी कायम आहे माझ्या वचनांवर! एकही गुत्तेदार मी नवीन निर्माण तर केला नाहीच पण एक रूपयाचा नवीन निर्णय मी घेतला नाही. मी माझ्या खात्याचा पैसा वाया न जाऊ देण्यासाठी योग्य पद्धतीने निर्णय घेतले. अंगणवाडीची बालके समोर ठेवणं हे चुकलं का?

मी सामान्य माणसासाठी राजकारणात आले आहे. माझ्यावरच्या आरोपांच मी खंडन करते व व्यथित मनाने त्याचा निषेध करते. मी निष्काम मनाने जनसेवेसाठी इथे काम करते. करोडोंच्या अपेक्षांच ओझं मला सहन होत. दुःखाचा डोंगर मी पेलवू शकते पण एका आरोपाचा शिंतोडा मला खुप जड होतो. मी राजकारणात जे कमवण्यासाठी आले ते पैसा नक्कीच नाही हे महाराष्ट्राला ठाऊक आहे.पण ज्या लोकांसाठी राजकारणात आले आहे त्यांचा यात रोल काय? जनतेतून आलेल्या नेत्यांना इथे काय भूमिका आहे? पण मी जर उदाहरण बनू शकेन की, माझ्यावरचे आरोप खोडल्यावर ज्यांनी हा प्लान रचला ( साहजिक पडद्यामागचे कलाकार वेगळे ) त्यांच्याबाबतीत जनता काय करेल? मतं देणारे करोडो आणि बिघडविणार मुठभर....पण बिघडविणा-यांनो मतं बदलण्याला वाघाच काळीज लागतं....पण कांही प्रश्न अनुत्तरित राहतात. ज्यांनी सनसनी निर्माण केली, त्यांचा या विषयात अभ्यास किती? हे सर्व नियमानुसार असल्यास सनसनी निर्माण करणा-यांच काय? बेजाबदारपणे मते मांडणा-या सोशल मिडियाचं काय? माझ्या स्वतःच्या, कुटूंबाच्या, प्रियजनांच्या डोळ्यात निर्माण झालेल्या अशांततेचं काय? माझ्या अनुपस्थितीत माझ्या आईच्या दारात निदर्शने करणार्या च्य काय? मी प्रत्येक उत्तर समर्थपणे देण्यास तयार आहे. पण प्रश्न परिपक्व येण्याबद्दल काय? आपल्या सिस्टीमला स्ट्राॅग बनवणे हेच आपले ध्येय असले पाहिजे पण सिस्टीमवरचा विश्वास संपवणे हेच ध्येय होते आहे त्यांचे काय?

माझ्या नेत्यांचे मी आभार मानते, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. मी सर्व प्रकारे निष्कलंक आहे. मी जर एक रूपयाची मिंदी असेल तर मंत्रालयच काय राजकारणातून कायमची बाहेर जाईन.....पण यात मी बाहेर जावे हेच ध्येय असेल तर काय?

पुढे आणखी वाचा....

बातम्या आणखी आहेत...