आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंकजा मुंडे विधानसभा लढणार, भविष्यातील सीएम म्हणून भाजप नेतृत्त्व तयार करणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( संघर्ष यात्रेचा आज तिसरा दिवसअसून नांदेडमधील अर्धापूरला पंकजाचे जोरदार स्वागत केले. त्यानंतर पंकजा कळमनुरी येथे पोहचल्या आहेत)
नांदेड- केंद्रात जावे की राज्यात राहावे अशा संभ्रमावस्थेत असलेल्या भाजपच्या आमदार व भाजयुमोर्च्या प्रदेशाध्यक्ष पंकजा मुंडेंनी राज्यात राहूनच राजकारण करण्याचे आज स्पष्ट केले. राज्यात महिला मुख्यमंत्री व्हायला हवी, असे मत व्यक्त करतानाच मी मात्र मुख्यमंत्रीपदाची दावेदार नाहीये असेही स्पष्टीकरण पंकजा यांनी दिले आहे.
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा जो काही निर्णय घेतील तो पक्षाला मान्य असेल असे म्हटले आहे. याचबरोबर भाजपात जास्तीत जास्त नेतृत्त्व तयार व्हावीत असे पक्षाला वाटत आहे. पंकजा मुंडेंचा राज्यातच जास्त उपयुक्त आहेत असे म्हटले आहे. पंकजा मुंडे भाजपचे भविष्य असून, पक्ष त्यांच्याकडे भावी मुख्यमंत्री (2014 ची निवडणूक नव्हे) म्हणून पाहत असल्याचे या घडामोडीवर स्पष्ट होत आहे. पुढील 20 वर्षाच्या राजकारणाचा विचार करून भाजपने हा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.
पंकजा मुंडे यांची संघर्ष यात्रा आज नांदेड जिल्ह्यात आहे. नांदेडमध्ये आज जाहीर सभा घेण्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी बोलताना पंकजा मुंडेंनी राज्यातच काम करण्यास आवडेल असे सांगितले. पंकजा म्हणाल्या, ‘मुंडे साहेबांचे विकासाचे अधुरे स्वप्न मी पूर्ण करणार आहे. माझे बाबा स्वाभिमानी होते. त्यांनी पार मेहनत घेऊन राज्यात पक्षाला मोठे केले. त्यांची कार्याची दखल घेऊनच मला केंद्रात मंत्रिपद द्यावे अशी पक्षाने पंतप्रधान मोदींकडे विनंती केली आहे. मात्र, मी बाबांकडून स्वाभिमानाचा गुण घेतला आहे. मला त्यांच्या जागेवरील अनुकंपा तत्त्वावर मंत्रिपद नको आहे. जे काही मिळवायचे आहे ते मी माझ्या कर्तृत्वावर मिळवीन, असे सांगत केंद्रातील मंत्रिपद नको असे अप्रत्यक्षरित्या सूचित केले.
पंकजा पुढे म्हणाल्या, बाबांचे स्वप्न काय होते ते तुम्हा सर्वांना माहित आहे. सामान्य जनता, कष्टकरी, शेतकरी यांचे राज्य यावे, मुंडे साहेबांची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी मी संघर्ष सुरु केला. जनताच माझी संपत्ती आहे. ती सांभाळणे माझे कर्तव्य आहे. सत्ता परिवर्तनासाठी हा संघर्ष आहे. लोकनेत्याचा वारसा चालविण्यासाठी मी माझे संपूर्ण जीवन खर्ची घालण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत यापुढे राज्यातील लोकांची सेवा करणार असल्याचे पंकजांनी सांगितले.
राज्यात महिला मुख्यमंत्री व्हायला हवी का असा प्रश्न विचारला असता पंकजा म्हणाल्या, होय राज्यात पहिली महिला मुख्यमंत्री व्हायला हवी. महिलांना अधिकाधिक संधी मिळाली पाहिजे. मात्र, मी मुख्यमंत्रीपदाची दावेदार नाही असेही पंकजांनी स्पष्ट केले.
पित्याच्या जागी केंद्रात मंत्रिपद घ्यावे की राज्यात महायुतीचे सरकार येण्याची शक्यता असताना येथे कॅबिनेट मंत्रीपद घ्यावे याबाबत पंकजा मुंडे संभ्रमावस्थेत होत्या. प्रदेश भाजपने गोपीनाथ मुंडेंच्या जागी पंकजांना मंत्रिपद द्यावे अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी व तत्कालीन पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांच्याकडे केली होती. केंद्रात गेले तरी राज्यात लक्ष ठेवावेच लागते. आपल्या कार्यकर्त्यांना वेळ देणे गरजेचे असते. मुंडेंच्या अचानक जाण्याने त्या सध्या एकाकी पडल्या आहेत.
मोदींनी केंद्रात पाचारण केले असले तरी तूर्त तरी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर आहेत. पंकजांना घरातून किंवा जवळचे असे राजकीय मार्गदर्शन मिळण्याची अजिबात शक्यता नाही. अशा परिस्थितीत दिल्लीत जाऊन अडकून पडणे योग्य नाही अशा मतांपर्यंत पंकजा आल्या आहेत. दुसरे असे की, पंकजांची मामेबहिण पूनम महाजन सध्या खासदार आहेत व त्यांना दिल्लीच्या राजकारणातच रस आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी पूनम यांच्याकडे सरचिटणीसपद दिले आहे. मागील तीन दशके प्रमोद महाजन केंद्रात व गोपीनाथ मुंडे राज्यात अशी भाजपची जी रचना होती त्याप्रमाणेच या दोन बहिणीही राजकारण करण्याची शक्यता आहे. पूनम केंद्रात व पंकजा राज्यात हे सूत्र राबवत राज्यात राहून पक्ष मजबूत करण्याबरोबरच आपली मजबूत पकड ठेवायची असा विचार सध्या पंकजा करीत आहेत. त्यामुळे राज्यातच राजकारण करणार असल्याचे त्यांच्याकडून संकेत मिळत आहेत.
आणखी पुढे वाचा...