आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीस, खडसे यांना चेकमेट; पंकजांना उतरवले सीएमच्या शर्यतीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळणार आणि राज्याचा मुख्यमंत्री भाजपचा होणार, या अतिमहत्त्वाकांक्षेमुळे सध्या भाजपच्या राज्यातील पहिल्या फळीतील नेत्यांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. यात अर्थातच पहिल्या क्रमांकावर सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस असून त्यांना पक्षश्रेष्ठींचाही आशीर्वाद असल्याचे समजते. त्यातच मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनीही उडी घेतली असताना विनोद तावडेंनेही आपण मागे नसल्याचे वेळोवेळी दाखवून दिले आहे. मात्र नेहमी पुढे पुढे करण्याच्या तावडेंच्या भूमिकेवर पक्षश्रेष्ठी नाराज असल्याने मुख्यमंत्रिपदासाठी आपल्या नावावर काट बसू शकते, याचा अंदाज घेत तावडेंनी आपल्या सोयीसाठी पंकजा मुंडेंचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केले आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अिमत शहा यांना फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत असे वाटत असल्याची जोरदार चर्चा आहे. लोकसभेतील भाजपच्या अभूतपूर्व यशानंतर ‘केंद्रात देवेंद्र, राज्यात नरेंद्र’ अशी नवीन घोषणा देण्यात आली. देवेंद्र यांच्याकडे अभ्यासूवृत्ती, स्वच्छ प्रतिमा तसेच युवा नेते अशी यशाची त्रिसूत्री आहे. मतदारांकडून घेण्यात आलेल्या मुख्यमंत्रिपदाच्या कौलातही भाजपकडून त्यांनाच पहिली पसंती आहे. मात्र, फडणवीस पहिल्या पसंतीचे मुख्यमंत्रिपदाचे उमदेवार असले तरी तावडेंचीही महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. उलट मराठा समाजाचे नेते म्हणून आपल्याला पहिली पसंती मिळायला हवी, असे त्यांना वाटते.

फडणवीस तावडे यांच्या या शर्यतीत खडसेही उतरल्याने तावडेंना आपल्यासमोर एक नवा प्रतिस्पर्धी आल्याची भीती वाटते. यामुळेच पंकजा मुंडेच्या संघर्ष यात्रेत त्यांनी राज्यभर फिरून मुंडे गटाचे समर्थन मिळवण्याचा प्रयत्न केला. लवकरच मुख्यमंत्री कोण, फडणवीस की तावडे? असा तिढा निर्माण झाला तर मुंडे गटाकडून आपल्याला समर्थन मिळेल, अशी आशा तावडेंना वाटते.

खडसेंच्या उत्तर महाराष्ट्रात चाळीसगाव येथील सभेत तावडेंनी थेट राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री म्हणून पंकजा मुंडे यांचे नाव जाहीर केले होते आणि हे सांगताना त्यांनी खडसेंना मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीतून बाहेर पडून पंकजांसाठी मार्ग मोकळा करण्याचा सल्लाही दिला. हे सांगतानाच तावडेंनी पंकजा मुख्यमंत्री होणार असेल तर मी गृहमंत्री होण्यास तयार आहे, असे साळसूदपणे बोलत एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा डाव खेळला आहे. खडसेंना मागे टाकून फडणवीस तावडे अशी दोघांचीच मुख्यमंत्रिपदाची शर्यत राहील, हे पाहिले आहे. याशिवाय भविष्यात पंकजा मुंडेंची पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमधील जागा पक्की झाल्यास आपला पंकजा गट एकत्र येऊन फडणवीसांना शह देऊ शकतो, असे तावडेंचे गणित आहे.

भविष्याचा विचार करून पंकजा मुंडे यांचे नाव पुढे : विनोद तावडे
भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर पंकजाने जी धडाडी दाखवली आहे, ती कौतुकास्पद आहे. मुख्य म्हणजे आपल्या वडिलांप्रमाणे तिने बहुजन समाजाशी मुंडे घराण्याशी जुळलेली नाळ तुटू दिलेली नाही. संघर्ष यात्रेतील तिचा वावर, जनतेशी संवाद करण्याची तडफ पाहता मला तर तिच्यात गोपीनाथ दिसत होते. संघर्ष यात्रेत पंकजा ही राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री, असा उल्लेख केला असला तरी तो वर्तमानकाळाशी जोडून नाही. भविष्याचा विचार करता पंकजात मुख्यमंत्री होण्याची मोठी क्षमता आहे, असे मला वाटते, अशी प्रतिक्रिया विनोद तावडे यांनी दिली.