आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pankaja Munde Palve Appeals To People Control Our Emotions

मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्यांनो भावनांवर नियंत्रण ठेवा- पंकजाचे आवाहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या समर्थकांत व चाहत्यांत जबरदस्त नाराजी आहे. आपल्या नेत्याचा अपघात नसून घातपात असल्याचे त्यांच्या मनातून काही केल्या जात नाहीये. त्यामुळेच अनेक समर्थक मुंडेंच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित करीत आहे. यातून एक वेगळाच संदेश जात आहे. त्यामुळे जनतेत चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून मुंडेंची कन्या पंकजा पालवे- मुंडे यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. याद्वारे त्यांनी मुंडेंसाहेबांच्या चाहत्यांना व जनतेला संयम राखण्याचे व भावना नियंत्रणात ठेवण्याचे आवाहन केले आहे.
पंकजा मुंडे-पालवेंनी प्रसिद्ध केलेले निवेदन वाचा जसेच्या तसे....

माझे बाबा आदरणीय मुंडे साहेब यांच्यावर प्रेम करणाऱ्या व त्यांना गमावून सैरभैर झालेल्या लाखो लोकांना व कुटुंबाला धीर देण्याचे अतिशय कठीण शिवधनुष्य मी सध्या पेलत आहे. साहेब हयात नाहीत ही कल्पनाच या निष्पाप प्रेम करणाऱ्यांना सहन होत नाही. कृपया साहेबांच्या मृत्यूच्या चौकशीचे भांडवल करू पाहणाऱ्यांना जनतेने निर्बल करावे, त्यांना बळी पडू नये. दु:खी मनाचा आयुध म्हणून वापर करू नये. त्यांच्या मृत्यूच्या सीबीआय चौकशीबाबत प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्याशी माझे बोलणे झाले असून ते पक्षाध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि पक्षश्रेष्ठींशी बोलले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर माझा पूर्ण विश्र्वास आहे. संसदेच्या पायऱ्यांवर नतमस्तक होणारा पंतप्रधान किती संवेदनशील असेल याची मला खात्री आहे. साहेबांच्या मृत्यूसंबंधातील जनमानसात असणाऱ्या आक्रोशाला ते नक्की दिशा देतील असा मला विश्वास आहे. त्यामुळे कृपया मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्यांनी नियंत्रण सोडू नये. - पंकजा मुंडे-पालवे.