आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही मालिका सेन्सॉर करण्याची पंकजा मुंडे यांची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- समाजात विकृती वाढत असल्यानेच महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढत आहे. बाप मुलीवर, भाऊ बहिणीवर बलात्कार करण्याच्या घटना घडत आहेत. अशा बातम्यांना प्रामुख्याने स्थान मिळत असल्याने या विकृती वाढत आहेत. तसेच टीव्हीवरील मालिकांमध्येही काहीही दाखवले जात असल्याने त्याचा परिणामही समाजमनावर होत आहे. यामुळे टीव्ही मालिकाही सेन्सॉर केल्या पाहिजेत, असे मत महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत व्यक्त केले.

मुली, बालके आणि महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी महिला व बालविकास विभाग कोणत्या उपाययोजना करणार, हा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर पंकजा म्हणाल्या, महिला आणि मुलींवरील अत्याचारांमध्ये त्यांच्या घरच्याच व्यक्ती सामील असल्याचे दिसून आले आहे. एका बापाने आपल्या मुलीवर सतत बलात्कार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. सख्खा बाप आपल्या मुलीशी असे कसे करू शकतो असा प्रश्न या घटना ऐकल्यावर मनात उद्भवतो. माणसांमध्ये ही विकृती का निर्माण झाली याचा विचार करणे आवश्यक आहे.
बातम्या वाचून कृत्य करण्याचे बळ
मुली व महिला सोडा, लहान मुलांवरही अत्याचार होत असताना दिसत आहेत. मला तर वाटते की, अशा घटनांना वर्तमानपत्रांत प्रामुख्याने स्थान दिले जात असल्याने अशा विकृती वाढत आहेत. वर्तमानपत्रांत बातम्या आल्याने अशा प्रकारचे कृत्य करण्याचे बळ काही जणांना मिळते.
महिला सुधारगृहांची स्थिती वाईट
महिला सुधारगृहांबाबत पंकजा म्हणाल्या, काही सुधारगृहांची स्थिती अत्यंत वाईट असल्याचे मान्य आहे. ही स्थिती सुधारण्याची योजना आम्ही आखत आहोत. सुधारगृहातून महिला पळून जातात याला अनेक कारणे असून ही कारणे दूर करण्याचा विचार आम्ही करीत आहोत.