आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pankaja Munde Rejects All Allegation\'s At Press Conference

मुंडे-गडकरी वादाची पुन्हा प्रचिती, मुनगंटीवार, तावडेंची पत्रकार परिषदेकडे पाठ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महिला व बालकल्याण विभागाच्या खरेदीत २०६ काेटींच्या खरेदी घोटाळ्याचा आरोप झालेल्या या खात्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी बुधवारी प्रथमच माध्यमांसमाेर येऊन त्यांच्यावरील गंभीर आरोपांना उत्तरे दिली. मात्र त्यांच्या मदतीला मंत्रिमंडळाचे नवनियुक्त प्रवक्ते व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार वा ज्येष्ठ मंत्री मानले जाणारे विनोद तावडे यांच्यापैकी काेणीही धावून अाले नाही. यावरून प्रदेश भाजपमध्ये अजूनही मुंडे-गडकरी वाद जिवंत असल्याची प्रचिती अाली. एकाकी मुंडे यांनी ताकदीने किल्ला लढवला तरी अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर आरोप होताच मंगळवारी अर्थमंत्री मुनगंटीवार, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे खास मानले जाणारे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तावडेंच्या बचावासाठी धाव घेतली. एकाच दिवसात दोनदा मुनगंटीवार व पाटील यांनी तावडेंसोबत मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. मात्र बुधवारी जेव्हा सह्याद्री अतिथिगृहात मुंडे यांची पत्रकार परिषद सुरू झाली तेव्हा याच अतिथिगृहात बाजूच्या दालनात बसलेले मुनगंटीवार हे मुंडे यांच्या बचावासाठी पत्रकार परिषदेत उपस्थित होतील, असे सर्वांना वाटत होते. मात्र मुनगंटीवार तिकडे फिरकलेही नाहीत.

विनोद तावडेही मंत्रालयातील त्यांच्या दालनात होते. मात्र तेही फिरकले नाहीत. मुंडेंच्या बाजूला बसायला गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता हे अर्धी पत्रकार परिषद झाल्यावर अाले. मात्र संपूर्ण पत्रकार परिषदेत मेहता यांनी मुंडे यांच्या बचावासाठी एकही वाक्य उच्चारले नाही.

काेणाची गरज नाही : पंकजा
भाजपत मुंडे आणि गडकरी गट जगजाहीर आहेत. तावडे असोत की मुनगंटीवार, हे दोघेही मुंडेविरोधी गटाचे म्हणून ओळखले जातात. गडकरी यांचे जवळचे असलेले तावडे-मुनगंटीवार यांनी पंकजा यांच्या बचावासाठी धाव न घेतल्याने अद्याप भाजपमध्ये या दोन्ही गटांतील संघर्षाची धार कमी झाली नसल्याचे स्पष्ट आहे. याबद्दल मुंडे यांना विचारले असता ‘माझी बाजू माध्यमांसमोर मांडण्यास मी एकटी सक्षम आहे. मला कुणाच्या मदतीची गरज नाही,’ असे म्हणत या वादावर फार काही बोलण्यास त्यांनी नकार दिला.

कागदपत्रांचे पुरावे देण्याची नुसतीच घाेषणा
मुंडे यांनी पत्रकार परिषद संपल्यानंतर २४ वस्तूंच्या खरेदीशी संबंधित कागदपत्रे तुम्हाला मिळतील, असे सांगितले खरे; मात्र ही कागदपत्रे प्रत्यक्षात देण्यात आली नाहीत. चिक्कीवाल्या संस्थेसोबत केलेल्या दर कराराची प्रत पत्रकारांनी मागितली. मात्र त्याबद्दलही त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. खरेदीचे आदेश असलेले २४ जीआर वेबसाइटवर न टाकणे ही चूक असल्याची कबुली त्यांनी दिली. अमरावतीच्या औषध कंपनीतर्फे पॅरासिटामॉलचे उत्पादन केले जात नसले तरी त्यांना याचे कंत्राट देण्यात काहीही चूक नाही, अशी सारवासारव करताना पंकजा यांची चांगलीच दमछाक झाली.

धनंजय मुंडेंना अनुल्लेखाने मारले !
या घोटाळ्याबद्दल सर्वप्रथम तक्रार विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि पंकजा यांचे चुलतबंधू धनंजय मुंडे यांनी २० मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. याला आपण उत्तर दिले आणि हे उत्तर मुख्य सचिवांकडे सादर केले, असे सांगताना पंकजा यांनी एकदाही धनंजय यांचे नाव घेतले नाही. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते, एवढाच उल्लेख त्या करीत होत्या.

ई-टेंडरिंगला पुरेसा वेळ, तरीही रेट काँट्रॅक्टने खरेदी
मुंबई - ई-टेंडरिंगला पुरेसा वेळ असतानाही रेट काँट्रॅक्टने वस्तूंची खरेदी करण्याची घाई महिला व बालविकास विभागाने केली, असा शेरा प्रधान सचिवांनी मारला असतानाही मंत्री पंकजा मुंडे यांनी खरेदीचे आदेश दिले, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी बुधवारी केला. सावंत यांनी प्रधान सचिवांनी खरेदीसंदर्भात मारलेल्या शेऱ्याची कागदपत्रेच सादर केली.

‘पंकजा धादांत खोटे बोलत असून ई-टेंडरिंगचा निर्णय झाला असताना रेट काँट्रॅक्टने खरेदी करण्याची गरज नाही, असा शेरा सचिवांनी दिला असतानाही मुंडे यांनी झटपट खरेदीचा निर्णय घेतला. यात त्यांचा हेतू स्वच्छ दिसत नाही. आता केंद्राकडून जास्तीचा निधी आल्याने तो वेळेत खर्च करायला हवा होता, अशी त्या सफाई देत असल्या तरी त्या खोटे बोलत आहेत हेच स्पष्ट होते,’ असा आरोप सावंत यांनी केला.

अधिवेशन होऊ देणार नाही : विखे पाटील
पंकजा मुंडे यांच्या खात्यात घोटाळा झाला आहे, हे उघड आहे. मात्र तरीही बचाव केला जात असेल तर ते दुदैवी आहे. मुंडेनी राजीनामा दिल्याशिवाय पावसाळी अधिवेशन होऊ देणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. मालवणी दारूकांडात १०७ बळी जाऊनही मुख्यमंत्र्यांना तिथे जाण्यास वेळ नाही, हा तर कळस झाला. फडणवीस यांनीही राजीनामा द्यावा, असे विखे म्हणाले.