मुंबई -
आपली आई राज्याची मंत्री आहे. विधिमंडळात नेमकी ती काय काम करते, आमदारांच्या प्रश्नांनी कशी उत्तरे देते, अधिवेशन म्हणजे नेमके असते तरी काय.... या सार्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांचा पंधरावर्षीय मुलगा आर्यमन याने बुधवारी दुपारी विधान परिषदेच्या प्रेक्षक गॅलरीत बसून कुतूहलाने प्रत्यक्ष कामकाज अनुभवले. विशेष म्हणजे आपला मामा व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या प्रश्नांना आई कशी सडेतोड उत्तरे देत होती, हेही तो न्याहाळत होता.
पंकजा मुंडे यांच्या खात्याचा विधान परिषदेत बुधवारी एकही प्रश्न आज नव्हता तरीही त्या पूर्ण प्रश्नोत्तराच्या पूर्ण तासाला बसून होत्या. त्याचे कारणही तसेच होते. घरपोच आहाराच्या एका लक्षवेधीला मंगळवारी उपसभापतींनी त्यांच्या विरोधात निर्णय दिला होता. त्याबाबत त्यांना निवेदन करायचे होते. पंकजा सभागृहात पहिल्याच बाकावर बसल्या होत्या. वरच्या प्रेक्षक गॅलरीत त्यांचा मुलगा आर्यमन बसला होता. त्याच्यासोबत त्याची मावशी आणि बीडच्या भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडेही होत्या. सभागृहाच्या कामकाजाबाबत आर्यमन कुतूहलाने प्रश्न विचारत होता आणि डॉक्टर मावशी त्याच्या शंकांचे निरसन करत होत्या. अर्थात, मराठीतून नव्हे तर इंग्रजीतून.
प्रश्नोत्तराचा तास संपला आणि पंकजा मुंडे बोलण्यास उभ्या राहिल्या. मला एक निवेदन करायचे आहे म्हणून त्यांनी वाचण्यास सुरुवात केली. निवेदन मोठे होते. उपसभापतींनी काल दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी शक्य नाही. त्यामुळे घरपोच आहार योजनेतील कोणाचेही कंत्राट रद्द होणार नाही, असे त्यांनी जाहीर केले. पंकजा यांच्या वक्तव्यावर सभागृहात एकच गोंधळ उडाला. त्यांना विरोध करण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार उठून उभे राहिले. ‘सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप घेतलेल्या संस्थांना तुम्ही कंत्राट देणार का?’ असे प्रश्न विचारले जाऊ लागले. इतक्यात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे उभे राहिले. उपसभापतींनी कालच रुलिंग दिले आहे. त्यानंतरही मंत्रिमहोदय कसे काय निवेदन करतात, असा त्यांनी आक्षेप घेतला.
आर्यमन मुंबईकर
आर्यमन अमित पालवे सध्या इयत्ता आठवीत आहे. वांद्र्याच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये तो शिकतो. विधिमंडळात तो बर्म्युडा घालून आला होता. मावशीबरोबर तो इंग्रजीतूनच संवाद साधत होता.
उत्तर संपताच टाळ्या
आपली आई आणि आपला मामा यांची विधिमंडळातील ही वैधानिक लढाई आर्यमन आस्थेने न्याहाळत होता. मध्येच काही प्रश्न विचारत होता. त्याच्या प्रश्नांची उत्तरे डॉक्टर मावशी देत होत्या. निवेदनावर उपस्थित केलेल्या प्रश्नांना पंकजा यांनी ठोस उत्तरे दिली. पंकजा यांचे उत्तर संपताच आर्यमन याने टाळ्याही वाजवल्या. ‘या विषयावर मी उपसभापतींशी बोलून निर्णय घेईन,’ असा निर्णय सभापतींनी दिला. त्यानंतर पंकजा सभागृहातून बाहेर पडल्या. त्या बाहेर पडताच आर्यमन आणि खासदार प्रीतम मुंडे यांनीही प्रेक्षक गॅलरी सोडली.