आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरकारकडून गोड भेट, ‘माझी कन्या भाग्यश्री’ - पंकजा मुंडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे यांच्याकडे महाराष्ट्र मोठ्या आशेने पाहत आहे. मराठवाडा, विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळावर कायमचा उपाय म्हणून जलयुक्त शिवाराची योजना यशस्वी करण्यासाठी पुढे सरसावलेल्या पंकजा यांनी आता ‘माझी कन्या भाग्यश्री...’ ही मुलीच्या जन्माचे स्वागत करणारी योजना तयार केली आहे. फडणवीस सरकारला आज शंभर दिवस पूर्ण होत असताना युती सरकारकडून ही योजना म्हणजे जनतेला दिलेली गोड भेट असेल, असा विश्वास पंकजा यांना वाटतो. यानिमित्ताने त्यांनी ‘दिव्य मराठी’चे विशेष प्रतिनिधी
संजय परब यांना दिलेल्या मुलाखतीत सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला.

प्रश्न : मुलीच्या जन्माचे स्वागत करणारी ही योजना काय आहे?
केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाव, बेटी बढाव’प्रमाणे ही योजना आहे. केंद्र सरकारची योजना ही सार्‍या राज्यांचा िवचार करून तयार करण्यात आली आहे. मुलींच्या कमी होत चाललेल्या जन्मदरावर उपाय म्हणून राज्यात मी ही योजना पुढे आणत असून यात मुलींच्या जन्माचे स्वागत केले जाणार आहे. जन्माला आलेल्या मुलीला, तिच्या आईवडिलांना आणि गावालाही यानिमित्ताने खास बक्षीस देऊन गौरवण्यात येईल. एका किंवा दोन मुलींनंतर संतती नियमन करून घेणार्‍या जोडप्यांना खास पारितोषिक दिले जाणार असून जन्मानंतर ती मुलगी स्वत:च्या पायावर उभी होईपर्यंतच्या कालावधीत तिला विशेष योजना देऊन सक्षम करण्यात येणार आहे.

प्रश्न : बाल कुपोषण रोखण्यासाठी काही पुढाकार घेतला जातो का?
नक्कीच. अंगणवाडीतर्फे राज्यात मुलांना दुपारचे जेवण दिले जाते. मात्र, हे जेवण खिचडी-भात किंवा उकडलेले कडधान्य अशा स्वरूपात असते. त्यात पालेभाज्यांचा समावेश झाला तर पुरेशा कॅलरीज मुलांना मिळतील. म्हणूनच अंगणवाडीच्या शेजारी परसबाग करून त्यात भाज्या उगवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्यासाठीचा निधी जिल्हा नियोजन विभागाकडून देण्याचा विचार केला जात आहे.

प्रश्न : दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून ग्रामविकासकडून कोणती पावले उचलली जात आहेत?
जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत राज्यातील ५ हजार गावांची निवड करण्यात आली असून त्यात दुष्काळाचा मोठा फटका बसलेल्या मराठवाड्यातील १६८२, तर अमरावती विभागातील १२०० गावांचा समावेश आहे. पावसाचे पाणी शिवारातच अडवणे हे या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य असून यासाठी ग्रामवकास, जलसंपदा, जलसंधारण, कृषी, वन, सामाजिक वनीकरण, पाणीपुरवठा, रोजगार हमी या विभागांतील यासंदर्भातील योजनांचे एकत्रीकरण केले जाणार आहे. कंपार्टमेंट बंडिंग, शेततळी, नालाबांध, सिमेंट बंधारे, नाला खोलीकरण, बंधारा दुरुस्ती, छोटे नाले, नदी जोड प्रकल्प, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे बळकटीकरण करणे, विहीर- बोअरवेल पुनर्भरण कामे, पाणी वापर संस्था बळकटीकरण, कालवा स्वच्छता व जनजागृती इत्यादी योजना एकत्र करून पाणी अडवण्यात येणार आहे. यातून दुष्काळाच्या प्रश्नावर उपाय काढण्यावर आमच्या सरकारचा भर असणार आहे.

प्रश्न : गोपीनाथ मुंडे यांची मुलगी म्हणून लोकांच्या तुमच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. त्याचे ओझे वाटते का? आणि त्या पूर्ण करण्यात कितपत यश मिळाले असे वाटते ?
अपेक्षांचे ओझे मला वाटत नाही. मी माझ्या बाबांप्रमाणे ३६५ दिवस काम करणारी आहे. एक महिला म्हणून मी स्वत:ला वेगळी समजत नाही. रात्रीचे साडेतीन वाजेपर्यंत काम करते. काही वेळा तर हजारो लोकांमध्ये मी एकटीच महिला असते. अपेक्षा, भीती, दडपण हे शब्द माझ्या डायरीत नाहीत. मला बाबांची अपुरी राहिलेली कामे, स्वप्ने पूर्ण करायची आहेत.

प्रश्न : राष्ट्रवादीकडून मराठवाड्यात तुमच्यासमोर धनंजय मुंडे यांचे मोठे आव्हान उभे केले आहे. या आव्हानाचा कसा मुकाबला करणार?
माझी लढाई ही कोणा व्यक्तीशी नाही तर ती माझ्याशीच आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी माझ्यावरोधात कोण उभे केले आहेत त्याचा मी मुळीच विचार करत नाही. मला काय करायचे आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी मी किती मेहनत घेते हेच लक्ष्य माझ्या डोळ्यासमोर आहे. मुंडे साहेबांवर प्रेम करणारी जनता माझ्या पाठीशी आहेच. तीन महिन्यांत चमत्कार हाेणार नाही.

प्रश्न : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने १०० दिवसात लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहे का?
नक्कीच. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारला लोकांनी पाच नव्हे, १५ वर्षे दिली. आम्हाला तर आता कुठे १०० दिवस झाले आहेत. तीन महिन्यांत चमत्कार होत नसतो. सरकारमधील प्रत्येक मंत्र्यासमोर विकासाचे उद्दिष्ट आहे. त्याचा अहवाल पंतप्रधानांना द्यायचा आहे. त्यामुळे फक्त बोलून नाही, तर करून दाखवावे लागणार आहे आणि त्यासाठीच आम्ही मेहनत घेत आहोत.