आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pankaja Munde Will Go On Loksabha & Also Ministership

पंकजाच मुंडेंची वारसदार, केंद्रात मंत्रीपद; लोकसभेवर बिनविरोध निवडून जाणार?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दिवंगत केंद्रीय ग्रामीणविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे-पालवे हीच त्यांची राजकीय वारसदार असणार आहेत. याचबरोबर पंकजाला लोकसभेवर पाठवून केंद्रात राज्यमंत्रीपद दिले जाण्याची शक्यता भाजपकडून वर्तविण्यात येत आहे. पंकजाच्या जागी मुंडेंची धाकटी कन्या यशश्री हिला परळी विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवारी देण्याचा विचार करीत आहे. मुंडे यांच्या अकाली मृत्यूनंतर सहा महिन्यांच्या आत लोकसभेवर नविन सदस्य नियुक्त होणे अपेक्षित आहे. मात्र, पंकजाला लोकसभेवर बिनविरोध निवडून आणून केंद्रात राज्यमंत्रीपद देण्याचे भाजपने प्रयत्न सुरु केल्याची माहिती आहे. मुंडेंच्या अपघाती मृत्यूमुळे राज्यातील जनतेसह बीड लोकसभा मतदारसंघातही मुंडेंबाबत प्रचंड सहानुभूती आहे. त्यामुळेच भाजपाने पंकजाला बिनविरोध संसदेत पाठवावे अशी भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची न करता पंकजाच्या विरोधात उमेदवार उभा करणार नसल्याचे कळते. त्यामुळे पंकजाला सर्वपक्षीय नेते लोकसभेवर पाठवतील अशी माहिती भाजपमधील सूत्रांकडून कळत आहे.
प्रदेश भाजपचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी परळीत पंकजासह मुंडे कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी काही मिनिटे राजकीय चर्चा झाल्याचे कळते. त्याआधी फडणवीस यांनी मोदी-गडकरींसह पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली व मुंडेंच्या कुटंबियांना भेटण्यासाठी जात असल्याची माहिती दिली. त्यावेळी राजकीय भूमिका काय असावी याबाबत चर्चा केली. यावेळी केंद्रीय नेतृत्त्वाने प्रदेश भाजपनेच चर्चा करून केंद्रात पाठवावा त्याचा विचार होईल असे आश्वासन दिले. यानंतर प्रदेश भाजपच्या वतीने पंकजाला बीड लोकसभेवर घ्यावे व केंद्रात तत्काळ राज्यमंत्रीपद द्यावी असा प्रस्ताव प्रदेश भाजपने तयार केल्याचे कळते. गडकरी व मोदींनी याला होकार दिल्याचे कळते आहे.
खडसे- फडणवीस- तावडे या त्रयींने हा प्रस्ताव तयार केला असून तो लवकरच केंद्राकडे पाठविला जाणार आहे. पंकजाने बीड लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुका लढविण्याला कोणाचाच आक्षेप असण्याचे कारण नाही. विरोधी पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीही याकडे सहानुभूतीने पाहणार आहे. आघाडीत ही जागा राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादीच्या खासदार व पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळेंनी ही पोटनिवडणूक पक्षाने लढवू नये व प्रतिष्ठेची करू नये अशी इच्छा पक्षाकडे व्यक्त केल्याचे कळते. त्यामुळे शरद पवार या पोटनिवडणुकीकडे दुर्लक्ष करून विधानसभेच्या निवडणुकीकडे लक्ष देतील असे सांगितले जात आहे. त्यामुळे पंकजा लोकसभेवर बिनविरोध निवडून जाण्याचा मार्ग जवळपास मोकळा आहे. तरीही भाजप काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीला याबाबत विनंती करणार असल्याचे कळते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याबाबत काय भूमिका घेते हे ही लवकरच स्पष्ट होईल.
पुढे वाचा, पंकजाला केंद्रात मंत्रिपद देण्यामागे भाजपची काय आहे रणनिती...