आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूला झुंजवून पँथरने अखेर मृत्यूवर दया केली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईच्या सर्वंकष, सर्वभक्षी भुकेला उद्देशून कधीकाळी ज्यानं आपल्या मनातली सूडघेऊ खदखद मोकळी केली तो नामदेव ढसाळ आता तिच्या विळख्यातून कायमचा सुटलेला आहे. बरेच दिवस मृत्यूला झुंजवून या पँथरने अखेर मृत्यूवर दया केली आणि ‘चल होऊ दे तुझ्या मनासारखं’ म्हणत त्याला मिठी मारली. विद्रोही मराठी, नॉन विद्रोही मराठी आणि भारतीय बरोबरच वैश्विक साहित्याला वेगळे वळण देणारा आशय, अभिव्यक्ती आणि भाषेचा खेळ करणारा हा जहाल गारुडी आज आपल्यातून निघून गेला.
नामदेव हा निव्वळ साहित्यिक कधीच नव्हता. सत्तरीच्या दशकात जोरकसपणे पुढे आलेल्या दलित चळवळीतील दलित पँथर या संघटनेचा प्रमुख नेता होता. सारस्वतांना उपेक्षितांच्या जगण्याचं, जाणिवांचं, तीव्र संतापाचं आणि त्यामधून आलेल्या बेधडक अभिव्यक्तीचं जालीम दर्शन घडविणारा मोठा दृष्टिदाता होता. त्याच्या बिनधास्त अभिव्यक्तीला र्शेष्ठ वैश्विक आणि वाड्मयीन जाणिवेचं अस्तर मूलत:च होतं. त्याचे जीवन आणि साहित्य हे मराठी जगतात कायम आदर, कुतूहल, वाद आणि चर्चेचा विषय राहिले.
मुंबईच्याच अक्राळविक्राळ विश्वातल्या एका वेश्यावस्तीत कधी तरी नामदेव जगायला आला होता. फॉकलंड रोडच्या या गोलपिठा भागातच त्याला जगण्याचं भान आलं. या भानावर आलेल्या तरण्याबांड कवीनं मग आपल्या शब्दांची शस्त्रे करून स्वत:सकट सर्वांच्याच बेगडी पण सुरक्षित आयुष्याचे वाभाडे काढले. म्हणूनच नामदेवची लेखणी वरणभातावर पसरवलेल्या साजूक तुपासारखी नसून गोफणगुंड्यातून सणसणत सुटणार्‍या गोट्यासोट्यांसारखी आहे. ती एका चळवळीची, भाकरीची, ऊन-चिकट रक्ताचे पाट पाहणार्‍या, सल्ली-डल्ली-बोटीवाल्यांची, अत्तदीपभवाच्या दिशेने नेणारी, कोणत्याही प्रकारची सेटलमेंट नाकारणारी आहे. (महाकवीला आज अखेरचा निरोप, अंत्यदर्शनासाठी ढसाळांचे पार्थिव आंबेडकर कॉलेजात)
गोलपिठामधून नामदेवनं शोषित समाजाची तोवर दुर्लक्षित राहिलेली अशी एक उघडी-वाघडी वेदना समाजापुढे मांडली की तिच्या केवळ शाब्दिक आविष्कारानेच बहुसंख्यांच्या समजूतींना घाम फुटला.
मी तुला शिव्या देतो, तुझ्या ग्रंथाला शिव्या देतो, तुझ्या संस्कृतीला शिव्या देतो,
तुझ्या पाखंडीपणाला शिव्या देतो
इव्हन मी आईबापांनादेखील शिव्या देतो.
बांबलीच्यांनो इथे जन्म घेऊन तुम्ही बर्बाद झालात,
आता मलाही जन्म देऊन तुम्ही बर्बाद केलेत.
आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय राजकारण, समाजकारण, समीक्षा, दलित चळवळीतील कंगोरे, कविता, कादंबरी असं बरचं काही लिहून नामदेवने कायमची गडद छाप मराठी साहित्यावर सोडली आहे. नकार, विद्रोह आणि आत्मभानाच्या प्रवासातून नामदेवची कविता दलित जाणिवेतून जरी जन्मालेली असली तरी तिची अभिव्यक्ती ही विखार पचवून अंतिमत: मानवतेच्या सर्वर्शेष्ठ मूल्यावर येऊन पोचलेली आढळते. गोलपिठा, तुही यत्ता कंची, या सत्तेत जीव रमत नाही, गांडू बगीचा, मुर्ख म्हातार्‍याने डोंगर हलविले, मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे, तुझे बोट धरून चाललो आहे हे कविता संग्रह आणि याचबरोबर हाडकी हाडवळा, निगेटिव स्पेस, आंधळे शतक, समष्टी, आंबेडकरी चळवळ, बुद्ध धर्म आणि शेष प्रश्न हे चिंतनपर गद्यलेखन करणारा नामदेव हा केवळ विद्रोही कवी नव्हता तर वैश्विक पातळीवरील समस्या याचं उत्तम भान असणारा द्रष्टा तत्वचिंतक होता हे सहज लक्षात येते. ढसाळांच्या कवितेतला विद्रोह इतक्या असंख्य तर्‍हा घेवून मराठी प्रस्थापित सारस्वतांना आजही न सुटणारे असंख्य प्रश्न विचारतो आहे, हे त्यांच्या कायम जीवित असण्याचं लक्षण राहणार आहे.
नामदेवाची मान ज्याच्यापुढे कायम लीनतेनं झुकली त्या भारतरत्न बाबासाहेबांना, ज्यांनी त्याला, त्याच्या कवितांना झुंझण्याचं, जगण्याचं बळ दिलं त्यांनाच त्यानं आपली शेवटची इच्छा सांगीतली होती. ती आता पूर्ण झाली आहे.
तुम्ही तुमची असली व्यक्तिपूजा कुणाला करू दिली नाही
तुमच्या पश्चात्य हा गुन्हा केला आहे मी
तुम्ही दिलेली शिक्षा भोगून
माझा जन्म पवित्र होईल बाबासाहेब.
कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी
ढसाळ यांची प्रकृती खालावल्याचे कळताच मंगळवारी रात्री बाँबे रुग्णालयात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. बुधवारी सकाळी त्यांच्या निधनाचे वृत्त पसरले. तशी रुग्णालयासमोरील गर्दी वाढत गेली. ढसाळ यांनी अखेरचा श्वास घेतला त्यावेळी त्यांच्याजवळ पत्नी मल्लिका, मुलगा अशुतोष आणि त्यांचे मावसभाऊ आमदार जयदेव गायकवाड अशी मोजकी मंडळी होती.
उपचाराचा खर्च शासन देणार
ढसाळ यांच्यावरील उपचारांचा खर्च राज्य शासन देणार आहे. या उपचारापोटी शासनाने आतापर्यंत 18 लाख रुपये रुग्णालयास दिलेले आहेत. उर्वरित रक्कमही शासन देणार असल्याचे ढसाळ यांचे मावसभाऊ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयदेव गायकवाड यांनी सांगितले.

पुढील स्लाइडमध्ये,
बाळासाहेबांशी दोस्ती
... आणि पँथर फुटली !