मुंबई- उल्हासनगरचे माजी आमदार व नगरसेवक पप्पू कलानी यांची जन्मठेप हायकोर्टाने कायम ठेवली आहे. 24 वर्षांपूर्वीच्या इंदर भटिजा हत्येप्रकरणी पप्पू कलानींना सेशन कोर्टाने दोषी ठरवले आहे. सध्या कलानी तुरूंगात आहेत.
कल्याणच्या सेशन कोर्टाने 3 डिसेंबर 2013 रोजी पप्पू कलानीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याविरोधात कलानी यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र कोर्टाने कलानींची याचिका फेटाळत कल्याण सेशन कोर्टाचा निर्णय कायम ठेवला आहे.
27 फेब्रुवारी 1990 रोजी विधानसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर घनश्याम भटिजा यांची गोळी घालून हत्या करण्यात आली. ही हत्या पप्पू कलानी यांनीच केल्याचा आरोप घनश्याम यांचे बंधू आणि एकमेव प्रत्यक्षदर्शी इंदर भटिजा यांनी करत
आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार केल्यामुळे त्यांना पोलिस संरक्षण पुरवण्यात आले होते. मात्र 28 एप्रिल 1990 रोजी सकाळी इंदरच्या अंगरक्षकाचीच बंदूक काढून घेत इंदरवर अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली होती. याप्रकरणी पप्पू कलानींना दोषी धरले होते. त्यांना सक्तमजुरीसह जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या पप्पू कलानीची पत्नी यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरली आहे. कलानींची पत्नी ज्योती या उल्हासनगर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढ़वत आहेत.