आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरणागत परेरा तांत्रिक अडचणीमुळे मोकळा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दारूच्या नशेत बेदरकारपणे गाडी चालवून फूटपाथवर झोपलेल्या सात जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अ‍ॅलिस्टर परेरा सोमवारी शिवडी सत्र न्यायालयासमोर हजर झाला. गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन रद्द करण्याचा आदेश दिल्यानंतर परेरा कुटुंबीय अज्ञातस्थळी रवाना झाले होते.
परेरा स्वत:हून न्यायालयासमोर हजर झाला असला, तरी पोलिस अथवा सत्र न्यायालय यांच्यापैकी कुणाकडेही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत नसल्यामुळे अखेर त्याला घरी पाठवण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर त्याला न्यायालयात हजर रहावे लागेल, असे पोलिस उपायुक्त प्रताप दिघावकर यांनी स्पष्ट केले.
25 वर्षीय परेरा 12 नोव्हेंबर 2006 रोजी पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्टी करून पहाटेच्या वांद्रे येथील आपल्या घरी परतत असताना त्याने कार्टर रोड येथील फूटपाथवर झोपलेल्या 15 कामगारांच्या अंगावर गाडी घातली. त्यामध्ये 7 जण जागीच ठार झाले होते. उच्च न्यायालयाने त्याला तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ती ग्राह्य धरत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. एम. लोढा व न्यायमूर्ती जे. ए. कहार यांच्या खंडपीठाने मागील आठवड्यात त्याचा जामीन रद्द करण्याचा आदेश दिला. परेराने आतापर्यंत तुरुंगात एकच महिना काढला आहे. सत्र न्यायालयाने परेराला सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली होती. तसेच, त्याच्याकडून आकारण्यात येणाºया पाच लाखांच्या दंडाची रक्कम अपघातग्रस्तांच्या नातेवाइकांना देण्याचेही आदेश दिले होते. या शिक्षेविरोधात त्याने अपील केले. मात्र उच्च न्यायालयाने 6 सप्टेंबर 2007 रोजी त्याची शिक्षा तीन वर्षांनी वाढवली. अशा गंभीर गुन्ह्याच्या तपासकामात ढिलाई दाखवल्यामुळे न्यायालयाने मुंबई पोलिसांवर ताशेरे ओढले होते.