आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Passenger Train Derails In Maharashtra, 19 Reportedly Dead

कोकण रेल्वे सुरळीत; मृतांना दोन लाख तर जखमींना 15 हजार रुपयांची मदत जाहीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला रविवारी सकाळी अपघात झाला होता. त्यानंतर कोकण रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या भीषण अपघातात 19 प्रवासी ठार आणि 132 जखमी झाले. राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (सोमवारी) जखमींची भेट घेवून त्यांची विचारपूस केली. अपघातात मृत्यु झालेल्या प्रवाशांच्या वारसांना दोन लाख तर गंभीर जखमींना 15 हजार आणि किरकोळ जखमींना पाच हजार रुपयांची तातडीची मदत चव्हाण यांनी जाहीर केली आहे.

दरम्यान, रेल्वेचे इंजिन आणि चार डबे नागोठाणेनजीक निदी भागात रुळांवरून घसरल्याने झालेल्या भीषण अपघातात 19 प्रवासी ठार आणि 132 जखमी झाले. रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर डब्यात अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. जखमींवर रोहा, नागोठाणे ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, गंभीर जखमींना मुंबईला हलवण्यात आले आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अपघाताचे ठिकाण बोगद्यानजीक असल्याने बचावकार्यात दिवसभर अडथळे निर्माण झाले. दरम्यान तब्बल 19 तासांनंतर कोकण रेल्वे मार्ग सुरळीत झाला आहे. आज (सोमवारी) सकाळी पाच वाजता ह.निजामुद्दीन- त्रिवेंद्रम ही पहिली गाडी रवाना झाली. त्यानंतरर सीएसटी- मंगळुरु ही दुसरी गाडी रवाना झाल्याचे रेल्वेच्या सुत्रांनी सांगितले.
कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत
या अपघातामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. तब्बल 19 तासांनंतर ही वाहतूक पूर्ववत झाली. दरम्यान, अपघातामुळे मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. प्रवाशांना मोठा मनस्तान सहन करावा लागत आहे. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच अनेक गाड्या पुणेमार्गे वळवण्यात आल्या होत्या.
मृतांच्या वारसांना 2 लाखांची मदत
रेल्वे मंत्रालयाने या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना 2 लाख रुपये, गंभीर जखमींना 50 हजार रुपये तर किरकोळ जखमी प्रवाशांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे. दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला झालेल्या अपघातासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी चर्चा केली. गृहमंत्री आर. आर. पाटील, पालकमंत्री सुनील तटकरे आणि नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनीही अपघातस्थळाला भेट दिली.
वळणावर ब्रेक दाबले
भिसे खिंडीला लागून असलेल्या वळणावर चालकाने अचानक जोरदार ब्रेक लावल्याने हा अपघात झाल्याचे काही प्रवाशांचे म्हणणे आहे. ब्रेक दाबताच वेगात असलेल्या या रेल्वेच्या इंजिनने रूळ सोडले आणि तीन डबेही घसरल्याचे प्रवाशांनी सांगितले.
वेळापत्रक कोलमडले
मंगला, नेत्रावती आणि निजामुद्दीन एक्सप्रेस या गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. या गाड्या लोणावळा-पुणे-मिरज-लोंढा-मडगाव मार्गे वळवण्यात आल्या आहेत. जनशताब्दी, कोकणकन्या आणि
राज्यराणी या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
० सकाळी अपघात होताच स्थानिक रहिवासी आणि प्रवाशांनी बचावकार्य सुरू केले.
० अपघातानंतर तासभर लोटला तरी जिल्हा प्रशासन, रेल्वेची मदत पथके घटनास्थळी पोहोचली नव्हती.
० दबलेल्या चारही बोगीमधील लहान मुलांना बाहेर काढण्यात यश.
० रेल्वे ठप्प झाल्याने कोकणात जाणार्‍या प्रवाशांना फटका. पनवेल येथून जादा एसटी सोडल्या.

बोगद्यामुळे बाधा
निदी भागात ऐन बोगद्याजवळ अपघात झाल्याने बचावकार्यात प्रचंड अडचणी आल्या.
प्रवाशांच्या नातेवाइकांसाठी रेल्वे प्रशासनाने दिलेली हेल्पलाइन : (022) 22755990 /22694090

या अपघाताची आणखी छायाचित्र, पुढील स्लाइडमध्ये