आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Passing Vehicles Will Drop From Toll In Kolhapur

कोल्हापूर पासिंगची वाहने वगळणार ! टोल आंदोलनातून तोडग्याचा होणार प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - ज्या आंदोलनामुळे राज्यातील टोलचा प्रश्न पेटला त्या कोल्हापूरच्या टोलप्रश्नातून मुक्ती मिळवण्यासाठी आता कोल्हापूर पासिंगची वाहने टोलमधून वगळण्याचा प्रस्ताव पुढे येण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यातील वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली. टोलविरोधी कृती समिती, शासन, आरआरबी यांना मान्य होईल असा हा प्रस्ताव, असेही सांगण्यात आले.

२००८ मध्ये कोल्हापूर शहरातील ५० किलोमीटरचे रस्ते करण्याबाबत महापालिका, राज्य रस्ते विकास मंडळ आणि आयआरबी कंपनी यांच्यामध्ये करार झाला. ८० टक्क्यांपेक्षा जास्त काम झाल्यानंतर कामाचा दर्जा आणि युटिलिटी शिफ्टिंग याबाबतचे मुद्दे पुढे आणत टोलला विरोध सुरू झाला. यानंतर हा प्रश्न चिघळत जाऊन टोल देणारच नाही, अशी भूमिका घेण्यात आली. टोलविरोधी कृती समितीने गेले साडेतीन वर्षे नेटाने आंदोलन सुरू ठेवले व याचे लोण राज्यात
पसरले.

वेगवेगळ्या मुद्द्यावरून न्यायालयीन लढाईही झाली. अनेक वेळा टोल नाके पेटवण्यात आले. सध्या टोलवसुली सुरूही आहे. कोल्हापूरचा टोल कोणत्याही परिस्थितीत बंद करण्याची युतीच्या नेत्यांनी प्रचारावेळी घोषणा केली होती. अशातच सत्ता आली व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रिपद चंद्रकांतदादा पाटील यांच्या रूपाने कोल्हापूरला मिळाल्याने आता
पुन्हा अपेक्षा वाढल्या आहेत. या प्रकल्पाचा नेमका खर्च किती झाला हे निश्चित करण्यासाठी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समितीही जाहीर करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत हे आंदोलन योग्य पद्धतीने समाप्त करण्यासाठी टोलमधून कोल्हापूर पासिंगची वाहने वगळण्याचा प्रस्ताव पुढे येण्याची शक्यता असून तो सकारात्मक असेल असे संकेत आहेत.

कसा निघेल तोडगा
१ प्रकल्पाची किंमत ठरवून त्याची एकरकमी किंमत शासन आयआरबीला अदा करेल.
२ आयआरबीला कोल्हापूरजवळील ३० हजार चौरस फूट जागा देण्यात आली आहे. तिथे कंपनीने बांधकाम केले आहे तिथे त्यांना एफएसआय वाढवून देणे.
३ कोल्हापूर पासिंगची वाहने वगळून टोल वसुली कोल्हापूर पालिका करेल.
४ शासनाने अदा केलेल्या पैशापोटीचा हप्ता दरवर्षी शासनाला अदा करेल.