मुंबई - काँग्रेसचा विधिमंडळ नेता ठरवण्यासाठी गुरुवारी झालेल्या बैठकीत सर्व नूतन आमदारांनी गटनेता निवडीचे अधिकार पक्षाध्यक्षा
सोनिया गांधींना देण्याचा ठराव मंजूर केला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या पदाच्या स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे आता ज्येष्ठ नेते व माजी मंत्री पतंगराव कदम, राधाकृष्ण विखे पाटील व बाळासाहेब थोरात यांची नावे आघाडीवर आहेत.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र व माजी राज्यमंत्री अमित देशमुख यांच्या रूपाने ऐनवेळी मराठवाड्यालाही संधी मिळू शकते, अशी शक्यता काँग्रेसच्या वर्तुळातून बोलली जात आहे.
काँग्रेसच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक गुरुवारी पक्ष कार्यालयात पार पडली. या वेळी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी विधिमंडळ नेता निवडीचे सर्व अधिकार पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना देण्याचा ठराव मांडला. तो ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्यानंतर पक्ष निरीक्षक मल्लिकाजुर्न खारगे यांनी प्रत्येक आमदाराशी स्वतंत्रपणे संवाद साधत त्यांची मते जाणून घेतली.
विधानसभेतील गटनेता निवडीबाबत आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या निराशजनक कामगिरीबाबत अनेक आमदारांनी पक्षातील काही नेत्यांबाबत निरीक्षकांकडे तक्रारीचा पाढा वाचल्याचे समजते.
डॉ. पतंगराव कदम
पक्षातील ज्येष्ठ नेते. धडाकेबाज नेतृत्व. पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते. विधिमंडळ कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव. राष्ट्रवादीशी दोन हात करू शकणारा नेता.शिक्षण क्षेत्रात मोठे कार्य.
मतदारसंघ-पलूस कडेगाव.
राधाकृष्ण विखे
नगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात दबदबा. घराण्याची पुण्याई. शिक्षण, कृषी, पणन खाती समर्थपणे सांभाळली. मुख्यमंत्रिपदाचे पक्षातील दावेदार. शरद पवार यांचे कट्टर विरोधक. पश्चिम महाराष्ट्रात चांगले वजन.
मतदारसंघ-शिर्डी.
बाळासाहेब थोरात
अभ्यासू, शांत आणि संयमी नेतृत्व. महसूल आणि शिक्षण खात्यातील कामगिरी लक्षवेधी ठरली. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील नाव. स्वच्छ प्रतिमा. सर्वांना सांभाळून घेणारे नेतृत्व. मात्र विखेंचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी.
मतदारसंघ-संगमनेर.
अमित देशमुख
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे राजकीय वारस. तरुण आणि उमदे नेतृत्व. मराठवाड्यातील मातब्बर घराणे. पक्षात चैतन्य निर्माण करण्याची क्षमता. राज्यमंत्री म्हणून अल्पकाळ का होईना मिळाली होती संधी.
मतदारसंघ-लातूर शहर.
तीन आमदार गैरहजर
काँग्रेसचे संख्याबळ ४२ आहे. त्यापैकी ३९ आमदार व परिषदेतील २२ सदस्य बैठकीला उपस्थित होते. कालिदास कोळंबकर, स्वरूपसिंग नाईक आणि नसीम खान हे तीन सदस्य गैरहजर होते. कोळंबकर आजारी असल्याचे समजते. दरम्यान, पक्षनिरीक्षकांकडून सर्व सदस्यांची मते जाणून घेण्यात आली आहेत. त्याचा अहवाल पक्षाध्यक्षांना देण्यात येईल. शुक्रवारी नाव निश्चित होईल, अशी माहिती माणिकरावांनी दिली.
पृथ्वीराज चव्हाण यांची माघार
‘गेली १५ वर्षे मी पक्षामध्ये व सरकारमध्येही विविध जबाबदा-या पार पाडल्या आहेत. पुढची पाच वर्षे मतदारसंघात लक्ष देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे पक्षाची कोणतीही जबाबदारी मी घेणार नाही,’ असे सांगत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधिमंडळ नेतेपदाच्या शर्यतीतून माघार घेतली. दरम्यान, काँग्रेसच्या बहुतांश नेत्यांचा त्यांच्या नावाला विरोध असल्याचे बुधवारीच स्पष्ट झाले होते.