आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pawanraje Nimbalkar Murder Case: High Court Slapped On CBI

पवनराजे निंबाळकर खून खटला: पद्मसिंह पाटील प्रकरणी ‘सीबीआय’वर ताशेरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कॉँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी व राष्‍ट्रवादीचे खासदार पद्मसिंह पाटील यांचा जामीन रद्द करण्याची विनंती खुद्द केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानेच (सीबीआय) केली होती, तरीही खटल्याच्या सुनावणीस त्यांच्याकडूनच वेळकाढूपणा केला जात आहे. सीबीआयच्या दृष्टीने ही गोष्ट हितावह नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने मंगळवारी सीबीआयला कानपिचक्या दिल्या.


पाटील यांना अलिबाग सत्र न्यायालयाने मंजूर केलेला जामीन रद्द करावा, या मागणीसाठी सीबीआयने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी झाली. त्यावेळी आपले म्हणणे
मांडण्यासाठी सीबीआयने आणखी वेळ मागितला. त्यामुळे संतापलेल्या न्यायालयाने सीबीआयला कठोर शब्दांत फटकारले. खुद्द फिर्यादी पक्षाकडूनच वेळकाढूपणा केला जात असल्याबद्दल न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात यापुढे आणखी वेळ वाढवून देणार नसल्याची तंबीही न्यायालयाने या वेळी दिली. या प्रकरणी पुढील सुनावणी 24 जून रोजी होईल.


काय आहे प्रकरण?
नवी मुंबईतील कळंबोली येथे 2006मध्ये पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर निंबाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सीबीआयने पद्मसिंह पाटील यांना जून 2009मध्ये अटक केली. त्यानंतर अलिबाग सत्र न्यायालयाने 25 नोव्हेंबर 2009मध्ये त्यांना जामिनावर मुक्त केले. पाटील या प्रकरणातील साक्षीदारांना धमकावत असून साक्षीदार फितूर होत आहेत. त्यामुळे त्यांचा जामीन रद्द करावा, अशी विनंती करत सीबीआयने उच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल केली आहे.