आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चव्हाणांविरुद्ध ‌पवारांनी परजले आरटीआय अस्त्र, सर्व मंजूर फायलींची मागवली माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच मंत्र्यांबाबत भ्रष्टाचाराचा संशय निर्माण करणा-या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने चांगलीच कंबर कसली आहे. माहितीचा अधिकार वापरून पृथ्वीराजांनी गेल्या दोन महिन्यांत भराभर हातावेगळ्या केलेल्या फायलींची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसने मागवली असून आरटीआयचे शस्त्र वापरून पृथ्वीराजांना जेरीस आणण्याचा विडाच उचलण्यात आला आहे. त्यामुळे एकटे पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

पावणेतीन वर्षांत प्रत्येक मंत्र्याची फाइल दहा वेळा तपासल्यानंतरही बाजूला ठेवणा-या पृथ्वीराज चव्हाणांनी शेवटच्या दोन महिन्यांत ज्या वेगाने फायलींवर सह्या करून त्या हातावेगळ्या केल्या, तो साराच प्रकार थक्क करणारा आहे. धोरण लकवा झाल्याप्रमाणे फायली दाबून ठेवणा-या पृथ्वीराजांनी दोन महिन्यांत भराभर मंजूर केलेल्या फायलींची चौकशी आम्ही करणार आहोत. माहितीचा अधिकार वापरून त्यातील सत्यता उघड करू, अशी घोषणा राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

नगर विकास खात्यांच्या महत्त्वाच्या फायलीही वेगाने हातावेगळ्या केल्या. हाच वेग आधी नव्हता. राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या फायली कित्येक महिने पडून होत्या. त्याचा फटका नारायण राणेंच्या उद्योग खात्यालाही बसला, असे पवार म्हणाले. विधिमंडळाच्या कार्यक्रमात गणपतराव देशमुख व एकनाथ खडसे यांनी सिंचनाविषयी प्रश्न उपस्थित केले. यावर सिंचनात नक्की काय झाले, ते मी पाहीन असे सांगण्याऐवजी पृथ्वीराजांनी थेट सिंचनाची श्वेतपत्रिका काढण्याचे जाहीर करत संशयाचे वातावरण निर्माण केले. त्याची मोठी किंमत मला तसेच राष्ट्रवादी पक्षाला मोजावी लागली. विरोधकांना आयते कोलीत मिळाले. मी राजीनामा दिला. श्वेतपत्रिका निघाली. माधवराव चितळेंच्या अध्यक्षतेखाली एसआयटीमार्फत चौकशी झाली. एटीआर रिपोर्ट आला. शेवटी यामधून निष्पन्न काहीच झाले नाही. आम्ही चूक केलेली नव्हती, तर दोषी कसे काय आढळणार? अवघे ०.०१ टक्के सिंचन झाले नाही, तर ५ टक्के सिंचन झाल्याचे दिसून आल्याचे स्पष्ट दिसून आले, पण यामुळे आमची झालेली बदनामी भरून निघाली नाही. मात्र, पृथ्वीराजांचा राष्ट्रवादीविरोधात संशय बळकट करण्याचा हेतू सफल झाला, असे पवार म्हणाले.

पवारांचे अजित अस्त्र
* पृथ्वीराज आमच्या विरोधात अपप्रचार करत आहेत. मात्र दोन महिन्यांत इतक्या वेगाने फायली मंजूर करण्याचे कारणच काय?
* सिंचन श्वेतपत्रिकेमुळे आमची बदनामी झाली. राष्ट्रवादीविरोधात संशय बळकट करण्याचा मुख्यमंत्र्यांचा उद्देश सफल झाला.
* नगर विकास खात्याच्या महत्त्वाच्या फायलीही वेगाने हातावेगळ्या केल्या. हाच वेग आधी का नव्हता?