आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदिवासी विद्यार्थ्याच्या मृत्युप्रकरणी ताशेरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - उत्तर महाराष्ट्रातील शहापूर येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळेत वेळेवर उपचार न मिळाल्याने तिसरीत शिकणाऱ्या आठवर्षीय सदानंद भगवान गुंड नावाच्या मुलाचा मृत्यू झाला हाेता. या प्रकरणी राज्य मानवाधिकार आयोगाने नाशिकच्या आदिवासी विकास आयुक्त यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढले असून सदानंदच्या पालकांना एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळवून दिली.

शहापूर येथील आदिवासी आश्रमशाळेत शिकणारा सदानंद आजारी असताना त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी आश्रमशाळेतच ठेवले. त्याच्या वडिलांना बोलावल्यानंतर त्यांनी त्याला मोटरसायकलवरून रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला. खरे तर नियमाप्रमाणे वर्षातून चार वेळा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणे आवश्यक असून त्यासाठी ३७ मेडिकल युनिट स्थापन केलेल्या असूनही विद्यार्थ्यांची तपासणी होत नसल्याबद्दल आयोगाने नाराजी व्यक्त केली आहे. सन २०१४-१५ साठी ४,८१४.९२ कोटी रुपयांची तरतूद आदिवासी विकासासाठी करण्यात आलेली असताना हा पैसा गेला कुठे, असा प्रश्नही आयोगाने उपस्थित केला आहे. आयोगाने या प्रकरणात सदानंद गुंडच्या माता-पित्यांना एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले अाहेत. तसेच आदिवासी आश्रमशाळांमध्ये आरोग्याच्या चांगल्या सुविधा द्याव्यात, प्रत्येक आदिवासी तालुक्यात एका पेडिट्रिशियनसह, एक फिजिशियन आणि नर्सिंग अशा मेडिकल स्टाफची नेमणूक करावी. आदिवासी पाडे दूर असल्याने ३ ते ५ तालुक्यांसाठी अत्याधुनिक अॅम्ब्युलन्स सेवा पुरवावी, वर्षातून कमीत कमी दोन वेळा तरी या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्याची कायमची नोंद ठेवावी आणि प्रोजेक्ट ऑफिसरने महिन्यातून एकदा मेडिकल स्टाफसह आश्रमशांळांना भेट द्यावी, असे आदेशही आयोगाने गृह विभागाला दिलेले आहेत.