आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोंबड्या, चपला अाणि फटाके...!, राणेंच्या पराभवानंतर वांद्रयात अभूतपूर्व जल्लोष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत राणेंचा पराभव झाल्याचे कळताच शिवसैनिकांच्या अंगात उत्साह संचारला हाेता. यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. हाती कोंबड्या, चपला घेऊन त्यांनी ढोलताशांच्या जोशात नृत्य करत त्यांनी तृप्ती सावंत यांचा विजयाेत्सव साजरा केला. विशेष म्हणजे जुहू येथील राणेंच्या भव्य इमारतींसमोर फटाके फोडत, भगवे झेंड फडकवत शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जयजयकार केला.... या जल्लोषामुळे राणेंच्या निवासस्थानाभाेवती पाेलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली. काही मिनिटे राणेंचे समर्थक व शिवसैनिकांत बाचाबाचीही झाली. पण, पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना दूर केले.

२००६ मध्ये राणेंनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत कणकवली पोटनवडणुकीत शिवसेनेचा दणदणीत पराभव केला होता. या निवडणुकीच्या आधी अाणि नंतरही बऱ्याच शिवसैनकांना राणे समर्थकांकडून जबर मारहाण झाली होती. हा राग आजही शिवसैनिकांच्या मनातून गेलेला नाही. त्यामुळेच सहा महिन्यांत दुसऱ्यांदा राणेंचा पराभव झाल्याचा अानंद जल्लाेषात साजरा केला.

प्रतिज्ञा पुन्हा पूर्ण
शिवसेनेच्या अरविंद भोसले यांनी राणे यापुढे पराभूत होत नाहीत तोपर्यंत चप्पल घालणार नाही, अशी शपथ २००६ मध्ये घेतली होती. २०१४ मध्ये कुडाळमध्ये वैभव नाईक यांनी राणेंचा पराभव केल्यानंतर भोसले यांना शिवसैनिकांनी सोन्याची चप्पल दिली होती. वांद्रेच्या पाेटनिवडणुकीत पुन्हा राणे उभे राहिल्यानंतर भोसले यांनी राणेंच्या पराभवासाठी पुन्हा चप्पल सोडली. मात्र या वेळी भोसलेंवर मागच्यासारखे ९ वर्षे अनवाणी राहण्याची वेळ अाली नाही. भाेसलेंच्या या प्रतिज्ञेची आठवण म्हणून शिवसैनिकांनी चपलाचे खूप जोड आणले होते.

कोंबड्या नाचवल्या...
नीलेश राणेंना पराभूत करून िवनायक राऊत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून बाजी मारली होती. या पराभवाचे शल्य अजूनही राणेंच्या मनातून गेलेले नाही. यामुळे आजही राणे हे राऊत यांना एकेरी संबोधून त्यांची पदोपदी लायकी काढतात. हा राग राऊतांच्या मनात आहे. यामुळे प्रचारादरम्यान राऊत यांनी ‘चेंबूरच्या कोंबडीचाेराकडे जुहू येथे नऊ मजली अालिशान इमारत घेण्याएवढा पैसा आला कुठून?’ असा सवाल उपस्थित केला होता. राऊत यांच्या आक्रमक प्रचारामुळे शिवसैनिकांमध्ये जाेश भरला हाेता, त्याचे दर्शन निकालानंतर झाले. विजयाेत्सवात जिवंत कोंबड्या आणून शिवसैनिकांनी नाचवल्या. आपल्या जल्लोषाची पातळी खालावत असल्याची त्यांना फिकीर नव्हती. कोंबड्या नाचवताना राणेंच्या नावाने शिमगा करण्याची संधी त्यांनी सोडली नाही. महिला शिवसैनिक तर भलत्याच आक्रमक होऊन राणेंिवरोधात घोषणा देत होत्या.

वाघ कोंबडी खातो!
एक शिवसैनिक तर वाघाचे रूप परिधान करून आला होता अाणि हातात कोंबडी होती. कॅमेरा त्याच्या दिशेने येताच तो काेंबडीच्या मानेचा चावा घेतानाची पोझ देत असे. शिवसेनेच्या महिला नेत्या राजूल पटेल म्हणाल्या, एका सामान्य कुटुंबातून आलेल्या राणेंना बाळासाहेबांनी जात, पात, भेदभाव, पैसा अडका न पाहता थेट मुख्यमंत्री केले. त्यांचाच विश्वासघात करून शिवसेनेला अावाज देणाऱ्या राणेंचा मातोश्रीच्या अंगणातच शेवटी पराभव व्हावा, हा नियतीचा न्याय आहे. तो साजरा करण्यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहोत.

पेटाने फटकारले
तृप्ती सावंत यांनी नारायण राणे यांचा पराभव केल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात चक्क कोंबड्या हाती घेऊन बेधुंद नृत्य केले. त्यात महिलांचाही सहभाग लक्षणीय हाेता. त्यावर राज्यभरात टीकाही झाली. प्राण्यांसाठी काम करणाऱ्या ‘पेटा’ या संघटनेनेही या कृत्यावर टीका केली. ‘मुक्या प्राण्यांना राजकारणाचा मुद्दा बनवू नये. अशा प्रकारे प्राण्यांना दुखापत करणे योग्य नाही,’ असे मत ‘पेटा’च्या पूर्वा जोशीपूर्णा यांनी व्यक्त केले. त्यावर या मुद्याचे भांडवल करण्याची गरज नसल्याचे मत शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले आहे.