आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगाधर पाणतावणे, गांगुर्डेंचे संचालकपद ठरले बेकायदा; अ‍ॅड. आंबेडकर यांचा मार्ग सुकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांच्या गटाचे डी. जी. गांगुर्डे आणि गंगाधर पानतावणे या दोघांचे पीपल्स एज्युकेशन सोसायटीतील संचालकपद उच्च न्यायालयाने बुधवारी बेकायदा ठरवले. त्यामुळे ‘भारिप’ अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा सोसायटीतील प्रवेशाचा मार्ग सुकर झाला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1945 मध्ये ‘पीईएस’ स्थापन केली. सात बुद्धिस्ट आणि चार इतर संचालक असण्याची तरतूद आहे. गेल्या काही दिवसांपासून संचालकांमध्ये आठवले आणि आंबेडकर असे गट पडले. 2002 मध्ये संचालकांमध्ये वाद निर्माण झाला. डी. जी. गांगुर्डे, गंगाधर पानतावणे आठवले गटाचे, तर एम. एस. गायकवाड आणि एस. पी. मोरे आंबेडकर गटाचे संचालक आहेत. दोन्ही बाजूंनी धर्मादाय आयुक्तांकडे चेंज रिपोर्ट सादर केले. आठवले गटाने अ‍ॅड. प्रीतम शेगावकर यांना अध्यक्ष म्हणून घोषित केले. मात्र, शेगावकर यांच्या मृत्यूनंतर आठवले अध्यक्ष झाले.

दरम्यान, आंबेडकर गटाने संस्था ताब्यात घेतली. त्यामुळे एकाच महाविद्यालयास दोन-दोन प्राचार्य अशी परिस्थिती उद्भवली. संस्थेत अनेकदा दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली. त्यामुळे मुंबई पोलिस आयुक्तांनी दोन्ही गटांच्या सदस्यांना संस्थेच्या आवारात प्रवेशबंदी घातली. मध्यंतरी शासन संस्थेवर प्रशासक नेमण्याच्या विचारात होते. दरम्यान, गांगुर्डे-पानतावणे विरुद्ध मोरे-गायकवाड वाद उच्च न्यायालयात पोहोचला. बुधवारी न्या. केतकर यांनी गायकवाड आणि मोरे हे दोघेच कायदेशीर संचालक असल्याचा निकाल दिला. गायकवाड-मोरे आता पीपल्सचे इतर संचालक ठरवू शकतील.

त्यामुळे उच्च न्यायालयाचा हा निकाल आठवले गटाला मोठा धक्का असल्याचे मानण्यात येते.

सध्या पीपल्सची सर्व बँक खाती गोठवण्यात आली आहेत. मध्यंतरी संस्थेतील प्राध्यापक-कर्मचार्‍यांचा पगार थकला होता. संस्थेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत घोटाळा झालेला आहे. समाजकल्याण विभागाने संस्थेला नोटीस बजावली आहे. संस्थेची महाड, पंढरपूर, पुणे, औरंगाबाद, मुंबई, बोधगया (उत्तर प्रदेश) येथे महाविद्यालये आहेत.