आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदानाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षांची खलबते; राष्ट्रपती निवडणुकीची पूर्वतयारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारताचे आगामी राष्ट्रपती काेण होणार, याचे उत्तर मिळवण्यासाठी सोमवारी मतदान होत अाहे. अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या या मतदानासाठी महाराष्ट्राचे विधान भवनही सज्ज झाले आहे. तर मतदानातील तांत्रिक बाबी समजावून देण्यासाठी विरोधी पक्षातर्फे मतदानाच्या पूर्वसंध्येला मुंबईत एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे मतदान होणार असून या मतदानात राज्याच्या विधानसभेचे २८८ सदस्य सहभागी होऊ शकतील.  दरम्यान, विराेधी पक्षांकडील मते फाेडण्याचा भाजपचा प्रयत्न यशस्वी न हाेऊ देण्याचे प्रयत्न कांॅग्रेस- राष्ट्रवादीकडून केले जात अाहेत.  

सध्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी येत्या २४ जुलैला निवृत्त होत आहेत. त्यामुळे या पदासाठी ‘एनडीए’तर्फे उमेदवारी मिळालेले बिहारचे माजी राज्यपाल रामनाथ कोविंद आणि ‘यूपीए’च्या वतीने लोकसभेच्या माजी सभापती मीरा कुमार यांच्यात ही लढत होत आहे. मुंबईतील महाराष्ट्र विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत हे मतदान होईल. मतदान पार पडल्यानंतर सोमवारी सायंकाळीच मतमोजणीसाठी मतपेट्या दिल्लीला पाठवल्या जाणार आहेत. २० जुलै रोजी संसदेत राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे.  
 
महाराष्ट्रातील मतदानासाठी लोकसभेचे महासचिव डॉ. अनुप मिश्रा हे निवडणूक निर्णय अधिकारी असून विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे हे सहायक निर्वाचन अधिकारी असणार आहेत. या निवडणुकीत महाराष्ट्र विधानसभेचे २८८ सदस्य मतदार आहेत. त्यापैकी छगन भुजबळ आणि रमेश कदम तुरुंगात असले तरी त्यांना मतदानात भाग घेण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे. या निवडणुकीसाठी लोकसभा तसेच राज्यसभेच्या प्रत्येक खासदाराच्या मताचे मूल्य ७०८ इतके गृहीत धरण्यात आले असून राज्यातल्या प्रत्येक आमदाराच्या मताचे मूल्य १७५ इतके गृहीत धरण्यात आले आहे. विधान परिषदेतल्या आमदारांना या निवडणुकीत मतदान करता येत नाही.   

पसंती क्रमाने मतदान
राज्याच्या आमदारांना या निवडणुकीत दिल्लीतील संसदेत जाऊनही मतदान करता येते. तसेच खासदारांना राज्याच्या विधिमंडळात येऊन मतदान करता येते. मात्र त्याबाबतची पूर्वसूचना संबंधितांना मतदानाच्या दहा दिवस आधी द्यावी लागते. हे मतदान गुप्त पद्धतीने होत असून प्रत्येक मतदाराने मतपत्रिकवेर पसंतीच्या उमेदवाराच्या नावापुढे पहिली पसंती किंवा दुसरी पसंती असे क्रमाने लिहिणे अपेक्षित असते. त्यासाठी स्वत:चा पेनही वापरण्याची मुभा नसून मतदानाच्या वेळी लागणारे पेन निवडणूक आयोग उपलब्ध करून देणार आहे. विशेष म्हणजे या पेनाव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही पेनाचा मतपत्रिकेवर वापर केल्यास ते मत बाद ठरणार आहे.    
महाराष्ट्रातून कुणाच्या पारड्यात किती मते?   
भाजप व मित्रपक्ष : भाजपची १२२, अपक्ष सहा व शिवसेनेची ६३ अशी एकूण १९१ मते आहेत.   
विरोधक : काँग्रेसचे ४२, राष्ट्रवादीचे ४१, माकप १, सपा १, शेकापचे तीन , एमआयएम दोन असे ९१ आमदार

अामदार रवी राणांच्या दाव्यात किती तथ्य?   
भाजपला समर्थन दिलेले आमदार रवी राणा यांनी आपल्या संपर्कात काँग्रेस - राष्ट्रवादीचे डझनभर आमदार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे विरोधी पक्षात खळबळ माजली आहे. राज्यातले सहा अपक्ष आमदार ‘एनडीए’चे उमेदवार रामनाथ कोविंद यांनाच मतदान करणार असल्याचेही अामदार राणा यांनी जाहीर केले आहे. आकड्याच्या गणितात कोविंद यांची बाजू वरचढ असली तरीही भाजपाच्या गोटातून विरोधकांची जास्तीतजास्त मते फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे निकालानंतरच राणांच्या दाव्यात किती तथ्य आहे, हे स्पष्ट होणार आहे.    

मते बाद न हाेण्याची विराेधकांकडून काळजी  
मतदान करताना मते बाद होऊ नयेत यासाठी मतदानातील तांत्रिक बाजू समजावून देण्यासाठी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात रविवारी विरोधी आमदारांची एक बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक मनीष तिवारी, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह साधारण ४५ आमदार उपस्थित होते. अाज गैरहजर असलेल्या आमदारांना साेमवारी सकाळी तांत्रिक बाबी समजावून दिल्या जाणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...