आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल महागले; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीने पेट्रोलवाढीचा पुन्हा एकदा भडका उडाला आहे. पेट्रोलचे दर प्रतिलिटर 1 रूपया 85 पैशांने वाढले आहेत. ही दरवाढ आज (शुक्रवारी) मध्यरात्रीपासून लागू करण्‍यात येणार आहे. यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला मात्र चांगलाच फटका बसणार आहे. मुंबईत पेट्रोलचा वाढीव दर आता 76.42 रुपये (प्रतिलिटर) एवढा राहील.

जून महिन्यातील ही तिसरी दरवाढ असणार आहे. याआधी पेट्रोलच्या दरात एक जूनला 75 पैशांनी तर 16 जूनला दोन रुपयांनी वाढ झाली होती. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 8 रूपये 60 पैशाचा तोटा सहन करावा लागत असल्याचे इंडि‍यन ऑयल कारर्पोरेशनच्या सूत्रांनी सांगितले. दि‍ल्‍लीत पेट्रोल 68.58 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल.

अमेरिकेच्या क्षितिजावर सकारात्मक आर्थिक संकेताची किरणे दिसू लागली आहेत. त्यामुळे जगभरातील प्रमुख देशांच्या चलनाची डोकेदुखी वाढली. त्याचा सर्वाधिक फटका रुपयाला बसला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून डॉलरकडून भारतीय रुपयाची यथेच्छ धुलाई सुरु आहे. आंतरबँक विदेशी मुद्रा विनियम बाजारात (फॉरेक्स) डॉलरच्या तुलनेत रुपयाने साठीची पातळी ओलांडली आहे. रुपयाच्या सर्वकालीन नीचांकीमुळे मंदीचे ढग भारतीय क्षितिजावर दाट होत आहेत.

रुपयाच्या घसरणीमुळे 'महागाई' आणखी पेटणार असल्याचे संकेत अर्थतज्ज्ञांनी यापूर्वीच दिले होते. आयात, डाळ, खाद्यतेल, पेट्रोल, डिझेल, गॅस, विदेशी शिक्षण, जीवनावश्यक वस्तू महागणार असल्याचाही अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

रुपयाच्या ऐतिहासिक घसरणीमुळे मंदीचे सावट भारतीय अर्थव्यवस्थेवर दाटणार आहे. डॉलर महागल्याने आयात-निर्यात समीकरण बदलून व्यापारी तूट फुगणार आहे. महागाई तसेच चालू खात्यातील वित्तीय तूट फुगल्याने मंदी उंबरठ्यावर आली असल्याचेही भाकीत अर्थतज्ज्ञांनी मांडले आहे.