आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Picture From Printer Take As Real Things : Miracals Of Architure's Karan Chaphekar

प्रिंटवरील चित्र वस्तूरूपाने हातात घेता येणार : अभियांत्रिकीच्या करण चाफेकरची किमया

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - संगणकावर तयार केलेला मजकूर अथवा चित्राची प्रिंट काढणे हा प्रकार आता नित्याचाच झाला आहे. मात्र, अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रिंटवरील हे चित्र वस्तूरूपाने हातात घेता आले तर.... ? विश्वास नाही बसणार, पण ठाणे येथील करण चाफेकर या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने तयार केलेल्या ‘थ्रीडी प्रिंटर’च्या साहाय्यने ही किमया साधली आहे. विशेष म्हणजे तो जगातील सर्वात स्वस्त थ्रीडी प्रिंटर ठरला आहे.

वैज्ञानिक भाषेत ‘रॅपिड प्रोटोटायपिंग’ म्हणून ओळखले जाणारे थ्रीडी तंत्रज्ञान ऐंशीच्या दशकापासून अस्तित्वात आहे. अमेरिका, युरोपपुरतेच आतापर्यंत मर्यादित असलेले हे तंत्रज्ञान भारतात आले आहे. भारतात थ्रीडी प्रिंटर बनत असले तरी त्याच्या किमती काही लाखांच्या घरात आहेत. दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात तिस-या वर्षाला शिकत असलेल्या करणला थ्रीडी प्रिंटिंगचे तंत्रज्ञान प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याची इच्छा होती. इंटरनेटच्या माध्यमातून त्याला अशा प्रकारच्या प्रिंटरची माहिती मिळाली. या प्रिंटरवरून प्रेरणा घेत त्याने काही महत्त्वाच्या सुधारणा करून एक छोटेखानी थ्रीडी प्रिंटर घरीच तयार केला.

लवकरच यूट्यूबवर
सध्या वर्कशॉपमध्ये ड्रिल, पेस्टसारख्या प्रचलित उत्पादन परंपरेला छेद देणारे हे नवीन तंत्रज्ञान आहे. कारण अनेक वस्तू वॉर्कशॉपमध्ये ऑर्डर देऊन बनवल्यास खर्च आणि वेळ जास्त लागतो, परंतु या प्रिंटरमुळे या दोन्ही गोष्टी वाचणार आहेत. या प्रिंटरची माहिती लवकरच यूट्यूबवर अपलोड करणार असल्याचेही करणने सांगितले.

22 हजार रुपये खर्च
थ्रीडी प्रिंटर तयार करण्यासाठी वर्षभर अभ्यास केला. याअगोदरही 40 हजार खर्च करून प्रिंटर तयार केला होता. आता सुधारित आवृत्ती तयार केली. नव्या प्रिंटरसाठी 22 हजार खर्च आला. बरेचसे पार्टस आयात केले. खर्च कमी असला तरी दर्जाशी तडजोड नाही. हा जगातील सर्वात स्वस्त प्रिंटर ठरणार आहे, असा दावा करणने केला.

काय आहे तंत्रज्ञान ?
ऑ टोकॅडमध्ये काम करताना थ्रीडीसाठी ‘एचटीएल’ फाइल लागते. यूएसबी किंवा मायक्रो एसडी कार्डद्वारेही ही फाइल प्रिंटरला जोडता येते. या फाइलच्या मदतीने ऑ टोकॅड सॉफ्टवेअर मशीनला समजेल अशा भाषेत प्रिंटरला लावण्यात आलेल्या मोटारची हालचाल, प्लास्टिकचे प्रमाण वस्तूचा आकार याबद्दल कमांड देते. कंट्रोल पॅनलमुळे वायर वितळण्याचे तापमान नियंत्रित होते. मोटारीला लावलेल्या गिअरबॉक्समुळे प्लास्टिकची वायर पुढे ढकलण्यासाठी पुरेशी ताकद मिळते.

...आणि क्षणात वस्तू तयार !
आपल्याला पाहिजे त्या वस्तूचे थ्रीडी डिझाइन संगणकावर तयार केल्यानंतर या प्रिंटरसाठी तयार केलेल्या कॅड/ कॅमसारख्या सॉफ्टवेअरमधून वस्तूच्या गरजेनुसार (पोकळ/ भरीव) प्रमाण सेट करायचे. त्यानंतर कमांड दिली की प्रिंटिंग सुरू होते. फक्त येथे कागदाऐवजी पॉलिलॅक्टिक अ‍ॅसिड हे प्लास्टिक वापरले जाते. हे प्लास्टिक मका, बटाट्यापासून तयार होत असल्याने पर्यावरणपूरक आहे. हे प्लास्टिक प्रिंटरला बसवलेल्या मोटरच्या ठिकाणी येऊन ठरावीक तापमानाला वितळून प्रिंटरच्या अर्धा मिलिमीटर छिद्रातून बाहेर पडते. थरावर थर जमत बघता बघता आपल्या डोळ्यासमोर वस्तू तयार होऊ लागते. लवचीक वस्तू तयार करण्यासाठी एबीएस प्लास्टिकचा वापर केला जातो.